Vande Bharat Train : येत्या नवीन वर्षात म्हणजे 2024 मध्ये लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. याशिवाय काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका देखील राहणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांना खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने विशेष रणनीती तयार केली आहे. निवडणुकीचे पडघम आत्तापासूनच वाजु लागले आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायबाप मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून संपूर्ण देशात लोकप्रिय बनलेली वंदे भारत एक्सप्रेस देशातील काही महत्त्वाच्या मार्गावर चालवण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 24 सप्टेंबर 2023 ला भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशातील तब्बल 9 महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. खरंतर ही गाडी 2019 मध्ये सर्वप्रथम रुळावर धावली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील 25 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला चालवण्यात आले आहे.
ज्या मार्गावर ही गाडी सुरू आहे तेथील रेल्वे प्रवाशांनी या गाडीला भरभरून असा प्रतिसाद दाखवला आहे. यामुळे भारतीय रेल्वे गदगद झाले असून आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. यानुसार आता पीएम मोदी 24 सप्टेंबरला 9 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
कोणत्या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला दाखवणार हिरवा झेंडा
मीडिया रिपोर्टनुसार, येत्या दोन दिवसात अर्थात 24 सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ वंदे भारत एक्सप्रेसची भेट देणार आहेत. रांची-हावडा, पाटणा-हावडा, विजयवाडा-चेन्नई, तिरुनेलवेली-चेन्नई, राउरकेला-पुरी, उदयपूर-जयपूर, कासारगोड-तिरुवनंतपुरम जामनगर-अहमदाबाद आणि हैदराबाद-बेंगळुरू या 9 महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे.
अर्थातच यावेळी महाराष्ट्राला वंदे भारतची भेट मिळणार नाही. सध्या स्थितीला आपल्या राज्यातून पाच वंदे भारत सुरू आहेत. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर आणि नागपूर ते बिलासपुर या पाच महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
तसेच सीएसएमटी ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस दरम्यान ही गाडी सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. विशेष म्हणजे या मार्गावर लवकरच ही गाडी चालवली जाणार आहे. तूर्तास मात्र महाराष्ट्राला वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.