Vande Bharat Train : देशात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासन विशेष प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळाले आहे. रेल्वे वाहतुकीचा विचार केला असता ही वाहतूक आधीच्या तुलनेत मजबूत व्हावी यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस ही मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली हाय स्पीड ट्रेन सुरू करण्यात आली आहे.
ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये रुळावर धावली होती. नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ही ट्रेन सर्वप्रथम धावली. सध्या देशातील जवळपास 34 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
या गाड्या रेल्वेच्या ताफ्यात आल्याने आता वाहतूक निश्चितचं सुरळीत झाली आहे. या स्वदेशी गाडीमुळे लोकांचा बहुमूल्य वेळ आणि पैसा वाचत आहे. या ट्रेनचा प्रवास खूपच आरामदायी देखील आहे.
यामुळेच दिवसेंदिवस वंदे भारत एक्सप्रेसची लोकप्रियता वाढत आहे. विविध भागातील नागरिकांच्या माध्यमातून ही ट्रेन सुरू व्हावी यासाठी मागणी केली जात आहे.
दरम्यान आगामी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पाहता तसेच महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा काळ पाहता सरकार वेगवेगळ्या मार्गांवर बंदी भारत ट्रेन सुरू करणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार मार्च 2024 पर्यंत एकूण 75 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू होणार आहे. अशातच आता प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.
देशातील आणखी एका महत्त्वाच्या शहराला वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन लवकरच मंगळुरु सेंट्रल ते मडगाव दरम्यान धावणार आहे.
वृत्तानुसार, खासदार नलिन कुमार कटील यांनी स्वतः ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस कर्नाटक किनारपट्टीवरील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
निश्चितच या मार्गावर जर ही हाय स्पीड ट्रेन सुरू झाली तर मंगळुरू आणि गोव्यातील मडगाव दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास गतिमान होणार आहे.
या संबंधित भागातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि या शहरांचा विकास सुनिश्चित होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.