Vande Bharat Train Latest News : केंद्र शासनाच्या माध्यमातून लवकरच देशाला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 10 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार आहेत.
पीएम मोदी स्वतः या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी उपस्थित राहणारे असल्याचे वृत्त देखील समोर येत आहे. खरं पाहता गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात संपूर्ण देशभरात पाच वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या.
या पाचही गाड्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे उद्घाटित करून भारतीय रेल्वेच्या ताब्यात आल्या आहेत. सध्या देशात एकूण 16 मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. यामध्ये आपल्या महाराष्ट्राला एकूण चार वंदे भारत एक्सप्रेस चा लाभ मिळत आहे. विशेष बाब म्हणजे ऑगस्ट महिन्यापर्यंत देशभरात 75 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी नियोजन आखण्यात आले आहे.
अशा परिस्थितीत आपल्या राज्यात आणखी काही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई ते मडगाव, मुंबई ते उदयपूर, मुंबई ते गोवा आणि पुणे ते सिकंदराबाद या चार मार्गावर लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची नियोजन भारतीय रेल्वेने आखले आहे.
दरम्यान 10 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी रांची ते पटनादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार आहेत. झारखंड आणि बिहार या दोन राज्यांना जोडणारी ही ट्रेन निश्चितच या दोन्ही राज्यातील रेल्वे प्रवासाला गती देण्याचे काम करणार आहे.
त्यामुळे रांची ते पटनादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. रांची-पटणा आठ डब्यांची वंदे भारत ट्रेन हजारीबाग मार्गे धावण्याची तयारी रेल्वेने केली आहे. रांची-पाटणा जनशताब्दी एक्स्प्रेस सात तासांत अंतर कापते, तर वंदे भारत ट्रेनने सहा तासांत हे अंतर कापले जाणार आहे.
म्हणजेच रांची ते पटनादरम्यानचा प्रवास वंदे भारत ट्रेन ने एक तास लवकर होणार आहे. दरम्यान या ट्रेन बाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जर काही तांत्रिक अडचण आली नाही तर १० मेपासून ही गाडी या मार्गावर सुरू होणार आहे.