Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस या संपूर्ण भारतीय बनावटीच्या ट्रेनबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. खरंतर ही ट्रेन अल्पावधीतच रेल्वे प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाली आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये धावली होती. तेव्हापासून आजतागायत ही गाडी देशातील एकूण 34 महत्त्वाच्या मार्गावर सुरू करण्यात आली आहे.
तसेच, देशातील विविध भागातील रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून ही गाडी सुरू करण्यासाठी जोरदार मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वे देखील या गाडीची लोकप्रियता पाहता देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यासाठी आग्रही आहे. आपल्या महाराष्ट्रातही विविध मार्गावर ही गाडी सुरू करण्याचे नियोजन रेल्वेने आखले आहे.
आत्तापर्यंत राज्यातील एकूण सहा महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
शिवाय महाराष्ट्रातील मुंबई ते जालना, मुंबई ते अमरावती, मुंबई ते कोल्हापूर आणि पुणे ते सिकंदराबाद या चार मार्गावर आगामी काही महिन्यात वंदे भारत ट्रेन चालवली जाऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. याशिवाय देशातील आणखी एका महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून चाचपणी केली जात असल्याचे वृत्त समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब येथील अमृतसर ते नवी दिल्ली दरम्यान लवकरच वंदे भारत ट्रेन चालवली जाऊ शकते. भारतीय रेल्वेने याबाबतचा निर्णय अंतिम केला असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत फिरोजपूर विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. विशेष म्हणजे या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस बाबतचा प्रस्ताव बडोदा हाऊसकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.
पण याबाबत रेल्वे विभागाचे अधिकारी उघडपणे काहीही बोलण्यास नकार देत आहेत. अर्थातच याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण रेल्वे विभाग लवकरच अमृतसर ते नवी दिल्ली दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू करू शकते असा दावा केला जात आहे. यामुळे आता भारतीय रेल्वे या मार्गावर खरच वंदे भारत ट्रेन सुरू करते का याकडे रेल्वे प्रवाशांचे विशेष लक्ष राहणार आहे.