Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस हे भारतातील एक संपूर्ण स्वदेशी बनावटीची सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू करण्यात आले. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली होती.
सध्या ही गाडी देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यातील 11 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. दुसरीकडे आता महाराष्ट्राला लवकरच वंदे भारत मेट्रो ट्रेन मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे.
खरंतर देशातील पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन अहमदाबाद ते भुज दरम्यान सुरू करण्यात आली आहे. यानंतर आता ही गाडी आपल्या महाराष्ट्राला देखील मिळणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर वंदे भारत मेट्रो ट्रेन चालवली जाणार अशी बातमी समोर येत आहे.
या मार्गांवरील वंदे भारत मेट्रोची ट्रायल नुकतीच पूर्ण झालीये. इंटरसिटी हाय-स्पीड प्रवासासाठी तयार करण्यात आलेल्या वंदे मेट्रो ट्रेनची पहिली ट्रायल रन अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर पूर्ण झाली.
या आठवड्यातचं ही ट्रायल रन पूर्ण झाली असून ट्रायल रन दरम्यान ही गाडी 130 किमी प्रति तास या वेगाने धावली. रेल्वे रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (RDSO) यांनी या ट्रेनच्या कामगिरीच्या प्रमुख पैलूंचे परीक्षण केले.
सुरतमधून मार्गक्रमण केल्यानंतर सोमवारी ही ट्रेन यशस्वीरीत्या मुंबईत पोहोचली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या धर्तीवर तयार केलेली, वंदे मेट्रो 12 वातानुकूलित डब्यांसह 1,150 एर्गोनॉमिकली डिझाइन केलेले आसन प्रदान करते.
यात सीसीटीव्ही आहेत, मीडिया रिस्पॉन्स सिस्टीम आणि रिअल-टाइम प्रवासी माहिती डिस्प्ले यासारख्या प्रगत सुरक्षा तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये आहेत. ही गाडी फारच हायटेक असून या गाडीची ट्रायल रन सुरत ते मुंबई दरम्यान झाली असल्याने नेमकी ही गाडी अहमदाबाद ते मुंबई अशी चालवली जाणार की सुरत ते मुंबई अशी चालवली जाणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
ही गाडी सुरत ते मुंबई धावणार की अहमदाबाद ते मुंबई याबाबत अजून कोणतीचं अधिकृत माहिती हाती आलेली नाही. मात्र लवकरच या संदर्भात अधिकृत अपडेट समोर येईल आणि ही गाडी मुंबई आणि गुजरातला जोडेल अशी माहिती दिली जात आहे.
नक्कीच या मार्गावर ही गाडी सुरू झाल्यानंतर प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे. या मार्गावर दैनंदिन कामानिमित्ताने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा दिलासा मिळणार आहे.