Vande Bharat Train : महाराष्ट्रात सध्या 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद या तीन मार्गांवर नुकत्याच काही दिवसांपूर्वी वंदे भारत एक्सप्रेस चे संचालन सुरू झाले आहे. या आधी महाराष्ट्रात सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर या आठ मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू होत्या.
अलीकडेच महाराष्ट्रात सुरू झालेल्या तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस मुळे राज्यातील या गाड्यांची संख्या 11 वर पोहोचली आहे. दरम्यान आता महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्याला वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे.
मराठवाड्यातील जालना पाठोपाठ आता नांदेडलाही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. नांदेड देखील वंदे भारत एक्सप्रेस सोबत जोडले जाणार अशी शक्यता आहे. कारण की, आता नांदेडला वंदे भारतची जोडणी मिळावी यासाठी जोरदार पाठपुरावा सुरू झाला आहे.
महाराष्ट्र शीख असोसिएशन मुंबईतर्फे हुजूरसाहेब नांदेड रेल्वे स्थानक हे वंदे भारतला जोडले जावे अशा आशयाचे निवेदन केंद्रीय गृहराज्यमंत्री यांना देण्यात आले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची महाराष्ट्र शीख असोसिएशन मुंबई या संस्थेने भेट घेत त्यांच्याकडे ही मागणी करत निवेदन सादर केले.
खरेतर नांदेड येथील सचखंड श्री हुजुरसाहेब या तीर्थस्थळाला देशभरातील भाविक भेटी देत असतात. येथे दररोज हजारोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात. मुंबईहून देखील हजारोंच्या संख्येने भाविक नांदेड येथे सचखंड श्री हुजूर साहेब येथे माथा टेकण्यासाठी येतात.
अशा परिस्थितीत, नांदेड रेल्वे स्थानक हे वंदे भारत एक्सप्रेस सोबत जोडण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी महाराष्ट्र शीख असोसिएशन मुंबईतर्फे देण्यात आलेले निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवू असे आश्वासन दिले आहे.
यामुळे भविष्यात मुंबई ते नांदेड दरम्यान वंदे भारत ट्रेन धावणार अशा आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. सध्या मुंबई ते जालना दरम्यान जी वंदे भारत ट्रेन सुरू आहे तीच ट्रेन पुढे नांदेड पर्यंत विस्तारित केली जाऊ शकते असेही काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये बोलले जात आहे. मुंबई ते नांदेड यादरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर हा प्रवास अवघ्या सहा तासात पूर्ण होणार आहे.
या ट्रेनमुळे नांदेड सहित संपूर्ण मराठवाड्यातील जनतेला जलद गतीने मुंबईत पोहोचता येणार आहे. मुंबईतील नागरिकांना देखील जलद गतीने नांदेड येथे पोहोचता येईल. तथापि, या संदर्भात केंद्रातील सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, रेल्वे मंत्रालय या मागणीवर गांभीर्याने विचार करणार का या गोष्टी पाहण्यासारख्या ठरणार आहेत.