Vande Bharat Ticket Booking : आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएसएमटी-सोलापूर आणि सीएसएमटी-शिर्डी या दोन नवीन वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. दरम्यान या गाड्यांच्या तिकीट बुकिंगबाबत आताच एक मोठी माहिती हाती आली आहे. मध्यरेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दि टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, 10 फेब्रुवारीपासून या दोन्ही वंदे भारत ट्रेन साठी तिकीट बुकिंगचा शुभारंभ होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस जरी 10 फेब्रुवारी रोजी सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होत असली तरी या ट्रेनने सर्वसामान्यांचा प्रवास 11 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. ही ट्रेन बुधवार वगळता आठवड्यातून सहा दिवस सीएसएमटीहून सोलापूरला धावणार आहे. मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन (गाडी क्रमांक-22225)च्या वेळेबद्दल बोलायचं झालं तर संध्याकाळी 16.05 वाजता ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.40 वाजता सोलापूरला पोहचणार आहे.
याशिवाय गाडी क्रमांक-२२२२६ म्हणजे सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूर येथून मुंबई दरम्यान गुरुवार वगळता आठवड्याच्या सर्व दिवस धावणार आहे. ही ट्रेन सोलापूरहुन दररोज सकाळी ६.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.३५ वाजता सीएसएमटीला पोहचणार आहे. सीएसएमटी ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या या ट्रेनला दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डूवाडी या ठिकाणी थांबे राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
याशिवाय, मुंबई साईनगर शिर्डी बाबत बोलायचं झालं तर ट्रेन क्रमांक-22223 ही मुंबई-साईनगर शिर्डी दरम्यान धावणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस जरी 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान महोदय यांच्या करकमलाद्वारे मध्यरेल्वेच्या ताफ्यात सामील होत असली तरी ही ट्रेन 12 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांच्या प्रवासासाठी सुरु होणार आहे. दरम्यान मुंबई शिर्डी म्हणजेच ट्रेन क्रमांक 22223 मंगळवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस धावणार आहे. ही ट्रेन दररोज 6:20 वाजता CSMT येथून सुटेल आणि त्याच दिवशी शिर्डी येथे 11:40 वाजता पोहोचणार आहे.
त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक-22224 म्हणजे साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही 11 फेब्रुवारीपासून प्रवासासाठी सुरू होणार आहे. ही ट्रेन शिर्डीहून मंगळवार वगळता दररोज धावणार आहे. ही ट्रेन शिर्डीहून दररोज 17:25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 22:50 वाजता सीएसएमटीला पोहचणार आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, दादर, ठाणे आणि नाशिकरोड या रेल्वे स्थानकावर या ट्रेनचे थांबे राहणार आहेत.