Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसच्या आगमनामुळे भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलला आहे. या गाड्यांमुळे देशातील रेल्वे प्रवासात फार मोठा बदल झाला आहे. भारतीय रेल्वे आता जगातील प्रमुख शहरांमधील रेल्वे व्यवस्थेला तगडे कॉम्पिटिशन देताना दिसते.
वंदे भारत एक्सप्रेस मध्ये असणाऱ्या हायटेक सोयी सुविधा प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत. या गाड्यांना प्रवाशांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळत असून सध्या देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
दरम्यान, आता भारतात वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु होणार आहे. ही गाडी सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रवाशांना आणखी आरामदायी प्रवास अनुभवायला मिळणार आहे. जानेवारी 2025 पासून वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होईल असे वृत्त नुकतेच समोर आले आहे.
स्वतः केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीच ही माहिती दिलेली आहे. BEML द्वारे निर्मित वंदे भारत स्लीपर गाड्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी डिझाइन केलेल्या आहेत. तसेच, यामुळे रात्रीचा प्रवास खूप आरामदायी होऊ शकतो.
या नवीन आणि आकर्षक ट्रेनचा नमुना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सप्टेंबर 2024 मध्ये प्रदर्शित केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे आता नवी दिल्ली ते जम्मू-काश्मीरपर्यंत वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे.
रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रीय राजधानी आणि जम्मू-काश्मीरची राजधानी यांच्यातील संपर्क वाढवण्यासाठी ही योजना आखली जात आहे.
भविष्यात ही गाडी बारामुल्लापर्यंत विस्तारित केली जाणार असाही विश्वास व्यक्त केला जातोय. महत्त्वाचे म्हणजे या गाडीचे संभाव्य वेळापत्रक देखील समोर आले आहे.
कसं राहू शकत वेळापत्रक?
जम्मू आणि काश्मीरमध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी सुरू आहे, जी नवी दिल्ली आणि श्रीनगर दरम्यान धावणार आहे. त्याच्या देखभाल आणि संचालनाची जबाबदारी उत्तर रेल्वे विभागाची असेल.
नवी दिल्ली-श्रीनगर वंदे भारत स्लीपर ट्रेन 800 किमी पेक्षा जास्त अंतर 13 तासांपेक्षा कमी वेळात कापेल. जर आपण वेळेबद्दल बोललो तर, वंदे भारत स्लीपर ट्रेन नवी दिल्लीहून संध्याकाळी 07:00 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 08:00 वाजता श्रीनगरला पोहोचणार आहे.
ही गाडी अंबाला कँट जंक्शन, लुधियाना जंक्शन, कठुआ, जम्मू तवी, श्री माता वैष्णो देवी कटरा, सांगलदान आणि बनिहालसह अनेक प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे.