Vande Bharat Sleeper Train : चेअर कार वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता याचे स्लीपर वर्जन देखील रुळावर येणार आहे. 2019 मध्ये जेव्हा चेअरकार वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तेव्हा रेल्वेला देखील ही गाडी एवढ्या लवकर हिट होईल असे वाटले नसावे. पण या गाडीचा वेग, या गाडीमध्ये असणाऱ्या अत्याधुनिक सोयीसुविधा आणि आरामदायी प्रवास यामुळे या गाडीने प्रवास करण्यास प्रवाशांनी पसंती दाखवली.
या गाडीची आणखी एक मोठी विशेषता म्हणजे सुरक्षितता. या गाडीचा प्रवास हा खूपच सुरक्षित असून यामुळे महागडे तिकीट दर असतानाही अनेकजण या गाडीने प्रवास करतात. ही गाडी सध्या देशातील 52 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. आपल्या महाराष्ट्रातूनही आठ वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
दरम्यान आता या गाडीचे स्लीपर वर्जन येत्या काही दिवसात रुळावर धावताना दिसणार आहे. विशेष म्हणजे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुद्धा राजधानी मुंबईला मिळणार असे वृत्त हाती आले आहे. मुंबई ते बरेली या मार्गावर ही गाडी सुरू होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे आता मीडिया रिपोर्ट मध्ये दिल्ली-मुंबई या मार्गावर देखील ही गाडी सुरू होणार असल्याचा दावा केला जाऊ लागला आहे. मुंबई-दिल्ली स्लीपर वंदे भारत ट्रेन पुढील वर्षापासून धावणार असे बोलले जात आहे.
सर्वाधिक मागणी असलेला, अतिशय वर्दळीचा असा हा मार्ग असल्याने या मार्गावर स्लीपर वंदे भारत चालवली जाणार आहे. हंगाम असो वा नसो, मुंबई आणि दिल्ली मार्गे नवी दिल्ली ते रतलाम या मार्गावर प्रवाशांना बर्थ मिळणे कठीण असते.
डिसेंबर अखेरपर्यंत दोन स्लीपर क्लास वंदे भारत तयार होतील असे सांगण्यात येत आहे. त्यातील एक दिल्ली-रतलाम-मुंबई आणि दुसरी दिल्ली-कोलकाता दरम्यान धावेल असा दावा केला जातोय.
16-16 डब्यांच्या या वंदे भारत गाड्या चालवण्यापूर्वी सप्टेंबर महिन्यात त्याच्या चाचण्या घेतल्या जातील. त्यानंतर पुढील वर्षी जानेवारीपासून या गाड्या संबंधित मार्गांवर धावणार आहेत.
नवी दिल्ली-रतलाम-मुंबई रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवण्यापूर्वी, रतलाम रेल्वे विभागातील नागदा ते गोध्रा या विभागात देखभालीचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मुंबई ते बरेली दरम्यान धावणार की मुंबई ते दिल्ली दरम्यान धावणार हे पाहणे खरेच उत्सुकतेचे ठरणार आहे.