Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता लवकरच देशात वंदे भारत स्लीपर ट्रेन धावताना दिसेल. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन नेमकी कोणत्या मार्गावर धावणार याबाबत अजून अधिकृत माहिती हाती आलेली नाही. पण वंदे भारत स्लीपर ट्रेन ही मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकत्ता यांसारख्या प्रमुख शहरांमधून सुरू होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, मध्य प्रदेशला देखील वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळणार असा दावा होतोय. मध्य प्रदेशला नवी वंदे भारत स्लीपर ट्रेन मिळण्याची शक्यता आहे. इंदूरहून भोपाळमार्गे जबलपूरसाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन नियमितपणे चालवण्याची रेल्वे तयारी करत असल्याची बातमी समोर आली आहे.
याआधी वंदे भारत स्लीपर व्हर्जन रेक लवकरच भोपाळ रेल्वे विभागाला उपलब्ध करून दिला जाईल. त्याची चाचणी भोपाळ ते यूपी-दिल्ली मार्गावर घेतली जाईल. कोटा नंतर भोपाळमध्ये आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या वंदे भारत स्लीपर आवृत्तीच्या चाचणीची तयारी वेगाने पूर्ण केली जात आहे.
वंदे भारत स्लीपर रेक ताशी १८० किमी वेगाने चालवून त्याची सुरक्षा तपासली जाणार आहे. सध्या रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये ही ट्रेन चालवून स्पीड ट्रायल घेण्यात येत आहेत. कोटा विभागातील यशस्वी चाचणीनंतर, पुढील टप्पा भोपाळचा आहे, ही चाचणी जानेवारी अखेरपर्यंत होईल अशी शक्यता आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळ ते यूपी आणि दिल्ली या मार्गावर वंदे भारत स्लीपर व्हर्जनची चाचणी प्रस्तावित असून त्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे पथक भोपाळला जाऊन तयारीला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. यानंतर ही ट्रायल होणार आहे.
यासोबतच इंदूरहून भोपाळमार्गे जबलपूरसाठी वंदे भारत स्लीपर आवृत्ती नियमितपणे चालवण्याची तयारी सुरू आहे. वंदे भारत स्लीपर आवृत्तीमध्ये स्वयंचलित दरवाजे, आरामदायी बर्थ, ऑन बोर्ड वायफाय आणि विमान यासारख्या वैशिष्ट्यांसह डिझाइन केले आहे.
भोपाळ रेल्वे बोर्डाने दावा केला आहे की, सर्वाधिक प्रवासी मार्गांचे सर्वेक्षण केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाला अहवाल पाठवण्यात आला आहे. भोपाळहून चालणाऱ्या वंदे भारत स्लीपर आवृत्ती ट्रेनचे अंतिम वेळापत्रक रेल्वेकडून लवकरच प्रसिद्ध केले जाईल, अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे.