Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू केल्यानंतर आता भारतीय रेल्वे लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवणार आहे. या ट्रेनची पहिली झलक समोर आणल्यानंतर वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या चाचण्यांना सुरुवात झाली आहे. लवकरच पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन मार्गस्थ होणार असल्याचे सांगितले जात आहे. या ट्रेनची झलक केंद्र रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः दाखवली.
दरम्यान आता ही गाडी लवकरच रुळावर धावताना दिसणार आहे. पण, ही गाडी कोणत्या मार्गांवर सुरू होणार याबाबत प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. अशातच, रेल्वे विभागाकडून महाराष्ट्रातील कोणत्या शहरांना या गाडीची भेट मिळू शकते या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
नागपूरचे नवे नियुक्त डी. आर. एम विनायक गर्ग यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या शहरातून सुरू होऊ शकते याबाबत माहिती दिली आहे. डी. आर. एम विनायक गर्ग यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मीडियाशी बोलतांना प्रवाशांच्या मागणीनुसार नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई या दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करावी ? याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सुपूर्द केला असल्याची माहिती दिली आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे या मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र मध्य रेल्वे कडून सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावावर रेल्वे बोर्ड अंतिम निर्णय घेईल.
यामुळे या प्रस्तावावर रेल्वे बोर्ड नेमका काय निर्णय घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, गर्ग यांनी मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने सादर केलेला हा प्रस्ताव मंजूर करायला हवा अशी आमची इच्छा आहे अन या प्रस्तावावर विचार व्हावा.
स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू असून, जशी ट्रेन उपलब्ध होईल, त्या प्रमाणे रेल्वे बोर्ड निर्णय घेईल. प्रत्येकाला स्लीपर वंदे भारत आपल्याकडे यायला हवी, अशी इच्छा आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.