Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यापासून रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा गतीमान झाला आहे. ही ट्रेन देशातील पहिली स्वदेशी बनावटीची हाय स्पीड ट्रेन असल्याचा दावा केला जातोय. वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सर्वप्रथम रुळावर धावली होती. ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर पहिल्यांदा सुरू करण्यात आली.
यानंतर टप्प्या-टप्प्याने देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे.
आता कमी अंतराची वंदे भारत मेट्रो ट्रेन लोकल ट्रेनच्या धर्तीवर चालवली जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. वंदे मेट्रोच्या नावाने धावणाऱ्या या गाड्यांची चाचणी जुलैपासून सुरू होणार आहे.
याशिवाय वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी देखील लवकरच सुरू होणार आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनची चाचणी या चालू महिन्यात अर्थातच मे महिन्यातच सुरू होणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
एक हजार किलोमीटर अंतर असणाऱ्या मार्गावर चालवली जाणार स्लीपर ट्रेन
मीडिया रिपोर्ट नुसार, वंदे भारत मेट्रो ट्रेन 100 ते 250 किलोमीटरचे अंतर असणाऱ्या दोन शहरांना जोडण्यासाठी सुरू केली जाणार आहे. याशिवाय वंदे भारत स्लीपर ट्रेन ही जें मार्ग 1000 किलोमीटरच्या अंतरातील आहेत त्या मार्गांवर चालवली जाणार आहे.
रेल्वे प्रवाशांना कोणते फायदे मिळणार
वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रवाशांना रात्रीच्या प्रवासात झोपण्यासाठी सामान्य गाड्यांप्रमाणेच लांब सीट उपलब्ध करून दिली जाणार आहे. या ट्रेनच्या तिकीट दराबाबत बोलायचं झालं तर याचे भाडे हे सामान्य स्लीपर ट्रेनच्या डब्याइतके असेल, असा दावा केला जात आहे.
वंदे भारत मेट्रो ट्रेन मुंबईच्या लोकल ट्रेनप्रमाणे छोट्या स्थानकांवर आणि कमी अंतरावरील स्थानकादरम्यान चालवली जाणार आहे. ही ट्रेन चालवण्याचा उद्देश हा स्थानिक गावे आणि शहरांना जोडणे हा आहे. या ट्रेनमध्ये थोडे जास्त भाडे देऊन प्रवाशांना वातानुकूलित डब्यातून प्रवास करता येणार आहे.
या 9 शहरांनां मिळणार वंदे मेट्रो आणि स्लीपर वंदे भारत
पश्चिम मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात, वंदे मेट्रो आणि स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन लखनौ, कानपूर, आग्रा, मथुरा, दिल्ली, रेवाडी, भुवनेश्वर, बालेश्वर आणि तिरुपती, चेन्नई या शहरांमधून चालवली जाणार आहे.
वंदे भारत ट्रेनची नवीन आवृत्ती लवकरच प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. रेल्वे बोर्डाकडून वेळापत्रक येताच या गाड्या भोपाळ, कोटा, जबलपूर विभागात सुरू केल्या जातील असा दावा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केला जात आहे.