Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर गदगद झालेल्या भारतीय रेल्वेने आता वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे आता रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होणार अशी आशा व्यक्त होत आहे.
वंदे भारत एक्सप्रेस बाबत बोलायचं झालं तर सध्या स्थितीला ही गाडी देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. यापैकी सात मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
राज्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते गोवा, मुंबई ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर आणि नागपूर ते इंदोर या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू आहे.
विशेष म्हणजे या सात मार्गांवर सुरू असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला खूपच उत्तम प्रतिसाद दिला आहे. या गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
मात्र वंदे भारत एक्सप्रेस या चेअर कार आहेत, म्हणजे या ट्रेनने खुर्चीत बसून प्रवास करता येतो. या ट्रेनमध्ये झोपून प्रवासाची सोय नाहीये. यामुळे लॉन्ग रूटसाठी या गाड्या फायदेशीर विकल्प ठरणार नाहीत.
हेच कारण आहे की सध्या लॉंग रूटसाठी राजधानी एक्सप्रेस सारख्या गाड्याच सुरु आहेत. शिवाय वंदे भारत ट्रेन रात्री धावत नाहीत. आता मात्र लॉंग रूट साठी वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाणार आहे.
ही गाडी या चालू महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन मार्च 2024 अखेर चालवली जाऊ शकते. विशेष म्हणजे, या गाडीसाठी दहा मार्ग निश्चित झाले आहेत.
सुरुवातीला ही गाडी दिल्ली ते हावडा आणि दिल्ली ते मुंबई या दोन महत्त्वाच्या मार्गांवर चालवली जाणार आहे. या दोन्ही मार्गांवर एकाच वेळी या गाडीचे संचालन सुरू केले जाईल अशी माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे.
त्यानंतर मग ही गाडी दिल्ली-बेंगळुरू, दिल्ली-चेन्नई, दिल्ली-गुवाहाटी, दिल्ली-भुवनेश्वर, दिल्ली-पाटणा या मार्गांवर सुरू होऊ शकते असा दावा होत आहे. त्यामुळे निश्चितच भविष्यात भारतीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी आरामदायी होईल अशी आशा व्यक्त होत आहे.