Vande Bharat Sleeper Train : 2019 मध्ये सुरू झालेल्या अन मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत विकसित झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला सध्या संपूर्ण देशात पसंती मिळत आहे. या ट्रेनमुळे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. ही गाडी सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली होती. सध्या स्थितीला देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.
यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत हे विशेष. दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता भारतीय रेल्वे याचे स्लीपर व्हर्जन लवकरच लॉन्च करणार असे चित्र आहे. आता याच स्लीपर वर्जन बाबत एक मोठे अपडेट देखील समोर आले आहे.
ते म्हणजे ईशान्य रेल्वेने स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबत एक महत्त्वाचा प्रस्ताव तयार केला आहे. गोरखपूर ते नवी दिल्ली स्लीपर वंदे भारत चालवण्याचा प्रस्ताव ईशान्य रेल्वेने तयार केला असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
विशेष बाब म्हणजे या प्रस्तावाला महाव्यवस्थापकांनीही संमती दिली असल्याचे म्हटले जात आहे. आता 10 ते 12 एप्रिल दरम्यान जयपूर येथे होणाऱ्या IRTTC (इंडियन रेल्वे टाईम टेबल कमिटी) बैठकीत हा प्रस्ताव आणि इतर काही गाड्यांच्या वेळेवर चर्चा केली जाणार आहे.
जर या बैठकीत वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर जुलैमध्ये जाहीर होणाऱ्या वेळापत्रकात या गाडीचा समावेश केला जाणार आहे. खरंतर अजूनही वंदे भारत एक्सप्रेसचे स्लीपर वर्जन सुरू झालेले नाही.
त्यामुळे जर या प्रस्तावाला मान्यता मिळाली तर देशातील पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन उत्तर प्रदेश मधील गोरखपुर ते राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली यादरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान आता आपण या प्रस्तावानुसार गोरखपूर ते नवी दिल्ली दरम्यानच्या प्रस्तावित वंदे भारत एक्सप्रेसचे संभाव्य वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक
सदर प्रस्तावानुसार ही गाडी आठवड्यातून तीन दिवस चालवली जाणार आहे. या स्लीपर वंदे भारत ट्रेनमुळे गोरखपूर ते नवी दिल्ली हा प्रवास फक्त बारा तासात होणार आहे. यामुळे उत्तर प्रदेश मधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरंतर उत्तर प्रदेश मधील बहुतांशी लोक रोजगार आणि निमित्त तथा शिक्षणानिमित्त दिल्लीला जात असतात.
यामुळे या लोकांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे. ही गाडी गोरखपूर येथून रात्री दहा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता राजधानी दिल्लीला पोहोचणार आहे. तसेच नवी दिल्ली येथून ही गाडी रात्री दहा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता गोरखपूर येथे पोहोचणार आहे.
केव्हा सुरु होऊ शकते ट्रेन
देशातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन ही गोरखपूर ते नवी दिल्ली दरम्यान चालवली जाणार अशी शक्यता व्यक्त होत आहे. अजून वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ट्रेनचे रेक तयार झालेले नाहीत. मात्र जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात याचे रेक तयार होणार आणि यानंतर मग गोरखपूर ते नवी दिल्ली दरम्यान ही गाडी सुरू होऊ शकते असे म्हटले जात आहे.
मागे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये मुंबई ते नवी दिल्ली या मार्गावर देखील स्लीपर वंदे भारत ट्रेन चालवली जाईल असे म्हटले गेले होते. यामुळे राजधानी मुंबईला देखील वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.