Vande Bharat Sleeper Train : भारतात लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. देशाचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीचं ही माहिती दिली आहे. येत्या तीन महिन्यात ही गाडी रुळावर धावताना दिसेल असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर रेल्वेने वंदे भारत स्लीपर गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील एक लोकप्रिय ट्रेन आहे. ही गाडी 2019 मध्ये रुळावर धावली होती. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली आणि सध्या देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
या गाडीमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा सुसाट झाला आहे. जलद आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
दरम्यान आता वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील रेल्वे प्रवाशांसाठी लवकरच सुरू होणार असल्याची बातमी समोर आली आहे. येत्या काळात स्लीपर वंदे भारत देशभर धावणार आहे. या प्रकारातील पहिली गाडी राजधानी मुंबईला मिळणार आहे.
मुंबई ते दिल्ली या मार्गावर देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होऊ शकते असा दावा केला जात आहे. तसेच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्याला देखील वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळण्याची दाट शक्यता आहे.
केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरली अण्णा मोहोळ यांनीचं ही माहिती दिलेली आहे. याशिवाय राजस्थान येथील जोधपूरच्या लोकांनाही या गाडीची भेट मिळू शकते.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी 2025 मध्ये या ट्रेनचे ऑपरेशन सुरू केले जाऊ शकते. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) च्या बेंगळुरू येथील प्लांटमध्ये स्लीपर वंदे भारत कोच तयार केले जात आहेत.
स्लीपर वंदे भारतमध्ये प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. ट्रेनमध्ये चढण्यासाठी आरामदायी पायऱ्या, स्वयंचलित दरवाजे, व्हॅक्यूम टॉयलेट्स, इंटरकम्युनिकेशन दरवाजे, उत्तम सस्पेन्शन सिस्टीम इत्यादी सुविधा असतील.
या गाडीच्या तिकीट दराबाबत बोलायचं झालं तर या गाडीचे तिकीट दर हे राजधानी एक्सप्रेस सारखेच राहणार असल्याचा दावा केला जातोय. यामुळे सर्वसामान्यांना देखील या गाडीचा लाभ होईल अशी आशा आहे.
तथापि देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबई ते दिल्ली या मार्गावरील धावणार यासंदर्भात कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. म्हणून या प्रकारातील देशातील पहिली गाडी ही कोणत्या मार्गांवर धावणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.