Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू केली जाणार आहे. लवकरच वंदे भारतचे हे दोन्ही वर्जन रुळावर धावताना दिसणार आहेत. खरे तर वंदे भारत ट्रेन 2019 मध्ये पहिल्यांदा रुळावर आली होती.
ही ट्रेन सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर ही गाडी टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर सुरू झाली. सध्या देशातील 52 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आणि नागपूर ते इंदोर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष म्हणजे आगामी काळात महाराष्ट्राला आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या देशातील ज्या ज्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे तेथील गाड्यांना प्रवाशांच्या माध्यमातून भरभरून प्रतिसाद मिळतोय.
यामुळे रेल्वेला चांगले उत्पन्न मिळत असून प्रवाशांचा प्रवासही जलद, सुरक्षित आणि आरामदायी झाला आहे. त्यामुळे गदगद झालेल्या रेल्वेने आता या गाडीचे स्लीपर वर्जन रुळावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन डिसेंबर 2024 अखेरपर्यंत धावणार अशी माहिती दिली आहे. इंटीग्रल कोच फॅक्ट्री चेन्नईचे महाप्रबंधक यू. सुब्बा राव यांनी याबाबत सविस्तर अपडेट दिली.
त्यांनी पहिल्या वंदे भारत ट्रेनची निर्मिती भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेडच्या बंगळूरु येथील वर्कशॉपमधून होईल, पुढल्या महिन्याच्या 20 तारखेपर्यंत या ट्रेनची निर्मिती होईल असा अंदाज असल्याचे सांगितले आहे.
BEML कडून रेल्वे डब्यांची बांधणी होत आहे. आम्हाला आशा आहे की, २० सप्टेंबरपर्यंत डबे चेन्नईतल्या आयसीएफमध्ये पोहोचतील. त्यानंतर रेक निर्मिती, अंतिम परीक्षण आणि इतर कामे उरकली जातील.
त्यासाठी साधारण १५ ते २० दिवस लागू शकतात. त्यानंतर मुख्य लाईन परीक्षण होईल, त्यात दोन महिने जातील. तथापि, सर्व प्रकारच्या तपासण्या आणि ट्रायल रन यासाठी बराच कालावधी लागणार आहे.
त्यामुळे ही गाडी डिसेंबर 2024 अखेरपर्यंत रुळावर येईल अशी माहिती रावं यांनी दिलीय. एकंदरीत गेल्या काही महिन्यांपासून ज्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची वाट पाहिली जात होती ती वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच रुळावर येणार आहे.