Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस सातत्याने चर्चेत असते. ही गाडी देशातील जवळपास 65 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत 11 वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली आणि गेल्या पाच वर्षांत वंदे भारत ही जवळपास सर्वच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये धावताना दिसत आहे.
असे असताना आता सरकार स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे. खरेतर आतापर्यंत फक्त चेअर कार असलेल्या वंदे भारत गाड्या धावत होत्या. चेरकार वंदे भारत एक्सप्रेस मधून प्रवाशांना शयनयान प्रमाणे झोपून प्रवास करता येणे अशक्य आहे.
यामुळे लांबच्या मार्गांवर आणि रात्रीच्या वेळी ही गाडी धावत नाही. पण वंदे भारत स्लीपरच्या माध्यमातून प्रवासी झोपून अगदीच आरामात लांबचा प्रवास करू शकतील. दरम्यान, आता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबत एक मोठी खुशखबर दिली आहे.
त्यांनी सांगितले की, सध्या 10 स्लीपर वंदे भारत ट्रेनचे उत्पादन सुरू आहे. तसेच, 200 वंदे भारत स्लीपर रेकचे उत्पादन तंत्रज्ञान भागीदारांना सोपविण्यात आले आहे. म्हणजेच येत्या काही दिवसांत एकामागून एक स्लीपर वंदे भारत गाड्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, सध्या देशात लांब आणि मध्यम अंतराच्या प्रवासासाठी 10 वंदे भारत स्लीपर ट्रेनचे बांधकाम सुरू आहे. पहिला प्रोटोटाइप देखील तयार करण्यात आला असून त्याची फील्ड चाचणी केली जाईल.
ट्रेनच्या रोलआउटची टाइमलाइन चाचण्या यशस्वीपणे पूर्ण होण्यावर अवलंबून असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान आता आपण वंदे भारत स्लीपर नेमक्या कोणकोणत्या मार्गांवर धावणारी याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
या मार्गांवर धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन
मीडिया रिपोर्ट नुसार पहिल्या टप्प्यात देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गावर या गाडीचे संचालन सुरू होणार आहे. ही गाडी सर्वप्रथम नवी दिल्ली ते श्रीनगर या मार्गावर धावणार आहे. या मार्गावर देशातील पहिली स्लीपर ट्रेन जाऊ शकते. यासोबतच मुंबई ते दिल्ली आणि पुणे ते दिल्ली या मार्गावरही ही गाडी सुरू होण्याची शक्यता आहे.
पुणे ते दिल्ली दरम्यान ही गाडी सुरू व्हावी यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. याशिवाय देशातील इतरही अनेक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू होणार आहे.