Vande Bharat Sleeper Train : भारतीय रेल्वे आता सातत्याने आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. जेव्हापासून भारतात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली आहे तेव्हापासून भारतीय रेल्वेचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलला आहे. 2019 मध्ये, वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन भारतात सुरू झाली. सध्या ही गाडी देशातील विविध मार्गांवर सुरू आहे.
भारतातील एकूण 65 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे आगामी काही दिवसात देशातील आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्राला ही 11 वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत.
ही भारतातील सर्वात वेगवान ट्रेन असल्याचा दावा रेल्वे कडून सातत्याने केला जातोय. पूर्वी शताब्दी ही सर्वात वेगवान ट्रेन म्हणून ओळखली जायची. मात्र शताब्दीचा वेगवान ट्रेन असल्याचा टॅग वंदे भारत ट्रेन कडे गेला आहे. या गाड्या 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 280 हून अधिक जिल्ह्यांमध्ये सुरु आहे.
दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ला प्रवाशांकडून चांगला जोरदार प्रतिसाद मिळतोय. यामुळे आता भारतीय रेल्वे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही ट्रेन पुढच्या वर्षी रुळांवर धावताना पाहता येईल. पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही नवी दिल्ली ते श्रीनगर दरम्यान धावणार असा अंदाज आहे.
भारताचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सप्टेंबर 2024 मध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या प्रोटोटाइपचे अनावरण केले. आता भारताला जानेवारी 2025 पर्यंत पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मिळण्याची अपेक्षा आहे. ही ट्रेन दिल्ली आणि श्रीनगर दरम्यान धावेल.
ही ट्रेन उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक म्हणजेच USBRL प्रकल्पांतर्गत चालवली जाईल. वंदे भारत स्लीपरद्वारे 800 किमीचे अंतर 13 तासांपेक्षा कमी वेळात कापले जाईल. एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ती दिल्ली ते श्रीनगरपर्यंत धावेल, नंतर तिचे ऑपरेशन बारामुल्लापर्यंत वाढवले जाईल.
नवी दिल्ली-श्रीनगर वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या मार्गाबद्दल सांगायचे तर, दिल्ली आणि श्रीनगर दरम्यान ही ट्रेन अंबाला कँट जंक्शन, लुधियाना जंक्शन, कठुआ, जम्मू तवी, श्री माता वैष्णो देवी कटरा, सांगलदान आणि बनिहाल स्टेशनवर थांबणार असा दावा केला जात आहे.
वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ही ट्रेन नवी दिल्लीहून संध्याकाळी ७ वाजता सुटेल आणि सकाळी ८ वाजता श्रीनगरला पोहोचेल. ट्रेनमध्ये प्रवाशांना तीन प्रकारचे डबे मिळणार आहेत. या गाडीमुळे नवी दिल्ली ते श्रीनगर दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. या गाडीचे तिकीट दर हे राजधानी एक्सप्रेस सारखेच राहतील असाही अंदाज समोर येतोय.