Vande Bharat Sleeper Train Latest Update : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्याने आणि रेल्वेचे नेटवर्क कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने रेल्वेने प्रवास करण्याला विशेष पसंती दाखवली जाते. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे देखील वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देते. नवनवीन एक्सप्रेस ट्रेन प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आल्या आहेत.
2019 पासून वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे. ही ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणारी देशातील पहिली स्वदेशी बनावटीची हाय स्पीड ट्रेन आहे. मात्र ही गाडी चेअर कार प्रकारातील आहे. म्हणजे या गाडीचे स्लीपर वर्जन अजूनही लॉन्च झालेले नाही.
मात्र लवकरच वंदे भारत एक्सप्रेसचे स्लीपर वर्जन लॉन्च केले जाणार आहे. येत्या एक-दोन महिन्यांनी हे वर्जन लॉन्च केले जाणार अशी बातमी समोर आली आहे. या गाड्या बेंगळुरूस्थित बीईएमएल या कंपनीमध्ये तयार केल्या जात आहेत.
वंदे भारत स्लीपर गाड्यांचे रेक येथे बनवले जात आहेत. सप्टेंबरमध्ये वंदे भारतचे नऊ स्लीपर व्हर्जन रेक तयार होतील, असे रेल्वे बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले. त्यानंतर दर महिन्याला किमान दोन ते तीन रॅक तयार केले जातील. स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसचा कमाल वेग केवळ 130 किमी असेल, असे सांगण्यात येत आहे.
म्हणजे चेअरकार वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा स्लीपर गाडीचा वेग कमी राहणार आहे. पण, स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये 16 कोच राहतील. यामध्ये 11 थ्री एसी, चार सेकंड एसी आणि एक फर्स्ट एसीचे कोचं राहणार आहेत. रेल्वे सुरक्षा आयोग लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी घेणार आहे.
त्याची चाचणी ऑगस्ट महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मात्र, ऑगस्टच्या मध्यापर्यंत स्लीपर वंदे भारत चालवण्याचा मार्ग मोकळा होईल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. यामुळे लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन रुळावर धावताना दिसणार असे बोलले जात आहे. पुढल्या महिन्यात ही गाडी सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.
कोणत्या मार्गावर धावणार
पहिल्या टप्प्यात नऊ स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस तयार होणार आहेत. पण या गाड्या कोणत्या मार्गावर चालवल्या जाणार याबाबत अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मात्र पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन महाराष्ट्राला मिळणार असा दावा मध्यंतरी केला जात होता.
ही गाडी मुंबई ते सिकंदराबाद या मार्गावर चालवली जाणार अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर ते पुणे दरम्यान ही गाडी चालवली गेली पाहिजे अशी मागणी रेल्वे बोर्डाकडे केली असून याबाबतचा प्रस्ताव देखील बोर्डाला सादर करण्यात आला आहे.
तसेच पाटणा ते नवी दिल्ली या मार्गावर देखील ही गाडी चालवण्याची मागणी करण्यात आली आहे. पण पाटणा-नवी दिल्ली स्लीपर वंदे भारतच्या कामकाजाच्या वेळेबद्दल विचारले असता, पूर्व मध्य रेल्वेचे सीपीएओ सरस्वती चंद्र म्हणाले की, आतापर्यंत या झोनने ही ट्रेन चालवण्याबाबत रेल्वे बोर्डाशी कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही.
याशिवाय मुंबई ते दिल्ली दरम्यानही वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव तयार असल्याची बातमी मागे समोर आली होती. यामुळे नेमकी ही गाडी पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या मार्गावर धावणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.