Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील लवकरच रुळावर धावताना दिसणार आहे. ही गाडी जानेवारीअखेरीस सुरू होणार असा अंदाज आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल. महत्त्वाचे म्हणजे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन आपल्या महाराष्ट्राला मिळणार अशी दाट शक्यता आहे.
मंडळी वंदे भारत एक्सप्रेसला मिळालेल्या यशानंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांनी ही चाचणी पूर्ण होणार आहे आणि चाचणी यशस्वी झाल्यास, रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून याला हिरवा सिग्नल मिळेल.
हा हिरवा कंदील मिळाला की ही ट्रेन प्रवाशांसाठी रुळावर पाठवली जाणार आहे. मात्र, वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एकावेळी किती प्रवासी प्रवास करू शकतील, त्यात किती डबे असतील, ही गाडी पहिल्यांदा कोणत्या रूटवर धावणार याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊयात.
कशी असणार वंदे भारत स्लीपर ट्रेन?
सध्या सुरू असणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन देशातील बहुतांशी मार्गांवर धावत आहे. महाराष्ट्रालाही आतापर्यंत अकरा वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते शिर्डी सीएसएमटी ते जालना सीएसएमटी ते मडगाव मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद मुंबई सेंट्रल ते गांधीनगर पुणे ते कोल्हापूर पुणे ते हुबळी नागपूर ते सिकंदराबाद नागपूर ते इंदोर आणि नागपूर ते बिलासपुर या मार्गांवर ही गाडी सध्या सुरू आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे आता महाराष्ट्राला देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मान मिळणार अशी शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेनचा पहिला मार्ग कोणता असेल याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही. रेल्वे बोर्डाकडून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन दिल्ली-मुंबई किंवा दिल्ली-कोलकाता दरम्यान चालवली जाऊ शकते, अशा चर्चा सुरू आहेत. यासाठी ट्रेनची ट्रायल घेतली जात असून, त्यात ताशी १६० ते १८० किलोमीटर वेगाने ट्रेन चालवली जात आहे. जानेवारी अखेर ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ही गाडी 16 डब्बे असणारी शयनयान एक्सप्रेस ट्रेन राहील.
एका ट्रेनमध्ये एकुण १६ डब्बे असून ११ एसी ३-टायर कोच, ४ एसी २-टायर कोच आणि १ फर्स्ट क्लास कोच असतील. तसेच ट्रेनला दोन एसएलआर कोच देखील असतील. ट्रेनमध्ये एकावेळी ८२३ प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. ३ टायर एसीमध्ये ६११ बर्थ, २ टायर एसीमध्ये १८८ बर्थ आणि फर्स्ट क्लासमध्ये फक्त २४ बर्थ असणार आहेत.