Vande Bharat Railway : 2019 मध्ये सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. ही गाडी सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली होती. यानंतर मग टप्प्याटप्प्याने या गाडीचे देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर संचालन सुरू झाले.
सध्या स्थितीला देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. विशेष म्हणजे आगामी काही महिन्यात आणखी काही मार्गावर या गाडीचे संचालन सुरू होणार असा दावा केला जात आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील पहिली भारतीय बनावटीची हायस्पीड ट्रेन आहे. या गाडीचा कमाल स्पीड हा 160 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. या गाडीमध्ये सर्व प्रकारच्या वर्ड क्लास सोयी सुविधा आहेत.
यामुळे या ट्रेनने प्रवास करण्याला प्रवासी पसंती दाखवत आहेत. या गाडीच्या तिकीट दरामुळे प्रवाशांमध्ये थोडीशी नाराजी पाहायला मिळते.
मात्र गाडीमध्ये असणाऱ्या सुविधा आणि गाडीचा वेग यामुळे वंदे भारत एक्सप्रेसला विशेष प्रतिसाद मिळत आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात आत्तापर्यंत सात वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर, इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष म्हणजे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस यादरम्यान लवकरच ही गाडी सुरू होणार अशी आशा आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी याबाबत माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दानवे यांनी मुंबईहून कोल्हापूर ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, संजय मंडलिक आदी उपस्थित होते. याचवेळी दानवे यांनी वंदे भारत ट्रेन दोन महिन्यांत सुरू होईल, असे आश्वासन दिले आहे.
खरंतर या वर्षाअखेर पर्यंत देशातील 60 मार्गांवर ही गाडी सुरू होणार आहे. यामध्ये मुंबई ते कोल्हापूर या गाडीचा देखील समावेश राहणार आहे.