Vande Bharat Metro : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता भारतीय रेल्वेने वंदे भारत मेट्रो ट्रेन देखील सुरू केली आहे. देशातील पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन गुजरातला मिळाली आहे. गुजरात मधील अहमदाबाद ते भुज दरम्यान ही गाडी सुरू आहे.
वंदे भारत मेट्रो ट्रेन 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम असून यामुळे अहमदाबाद ते भुज हा प्रवास जलद आणि सुरक्षित झाला आहे. दरम्यान आता याच मेट्रो ट्रेन संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मुंबई शहराला सुद्धा वंदे भारत मेट्रो ट्रेनची भेट मिळणार आहे. अहमदाबाद ते मुंबई या वंदे मेट्रो ट्रेनची (हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प) पहिली चाचणी या आठवड्याच्या सुरुवातीला यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.
ही ट्रेन ताशी 130 किलोमीटर वेगाने धावली, असे सूत्रांनी सांगितले आहे. अहमदाबादहून सुरतमार्गे ही ट्रेन सोमवारी दुपारी मुंबईला पोहोचली. तज्ञांनी सांगितले की, वंदे मेट्रो ट्रेन वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर प्रेरीत आणि तयार करण्यात आली आहे.
रेल्वेच्या रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (RSDO) च्या टीमच्या देखरेखीखाली ही चाचणी घेण्यात आली. आरएसडीओच्या अधिकाऱ्यांनी ट्रायल रन दरम्यान कंपन आणि शॉक यासारख्या घटकांचे मूल्यांकन केले आहे.
ट्रेनमध्ये 12 कोच आहेत ज्यात 1,150 एर्गोनॉमिकली डिझाइन केलेल्या सीट आहेत. संपूर्ण वातानुकूलित डबे, सीसीटीव्ही देखरेख, टॉक बॅक सिस्टीम, प्रवासी माहिती डिस्प्ले बोर्ड इत्यादी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ही ट्रेन बनवण्यात आली आहे.
या ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे वेग वाढवण्याची आणि त्वरीत गती कमी करण्याची क्षमता, ज्यामुळे मध्य-अंतराच्या शहरांमधील प्रवास जलद होतो. ट्रेनचा कमाल वेग 130 किमी/तास आहे, जो मुख्य प्रवाहातील इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (MEMU) ट्रेनपेक्षा वेगवान आहे.
ही नवीन इंटरसिटी मेट्रो रेल्वे सेवा प्रामुख्याने 250 ते 350 किमी लांबीच्या इंटरसिटी मार्गांसाठी आहे. याचा सरासरी प्रवास वेळ 3 ते 5 तासांच्या दरम्यान राहणार आहे. अहमदाबाद ते मुंबई या मार्गांवर वंदे भारत मेट्रो ट्रेनची ट्रायल रन सुरु झाली आहे.
यामुळे येत्या काही दिवसांनी या मार्गावर आपल्याला वंदे भारत मेट्रो धावताना दिसणार आहे. असे झाल्यास मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास आणखी जलद होणार आहे.
ही गाडी सुरत मार्गे धावणार असल्याने याचा फायदा सुरतमधील नागरिकांना देखील होणार आहे. सुरत मध्ये महाराष्ट्रातील हजारो नागरिक वास्तव्याला आहेत या गाडीमुळे या नागरिकांना फायदा होईल अशी आशा आहे.