Vande Bharat Metro Train : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता भारतात वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू होणार आहे. ही गाडी लवकरच लॉन्च केली जाणार आहे. खरे तर वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली. सर्वात आधी ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतरही महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला गेला.
देशातील तब्बल 52 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे तेथे प्रवाशांकडून या गाडीला चांगला प्रतिसादही मिळतोय. महाराष्ट्रातुन आतापर्यंत 8 वंदे भारत एक्सप्रेस सूरु झाल्या आहेत. या आठ वंदे भारत एक्सप्रेस पैकी सहा गाड्या मुंबईला मिळाल्या आहेत.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर आणि नागपूर ते इंदोर या आठ मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.
दरम्यान या सर्व मार्गांवर चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ला प्रवाशांच्या माध्यमातून खूपच उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात भरीव वाढ झाली आहे. दरम्यान, आता वंदे भारत स्लीपर ट्रेन आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन सुद्धा लाँच केली जाणार आहे.
यातील वंदे भारत मेट्रो ट्रेन संदर्भात नुकतीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन गांधीनगर येथून सुरु होणार आहे. यासाठी ही गाडी अहमदाबादमध्ये दाखल सुद्धा झाली आहे.
ही ट्रेन गांधीनगर ते भुज दरम्यान चालवली जाईल अशी शक्यता असून या मार्गावर चालवल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनची वंदे भारत मेट्रो ट्रेन जागा घेणार आहे. तसेच ही वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरत ते गांधीनगर दरम्यान चालवण्याचाही प्रस्ताव रेल्वेकडे विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे.
तथापि, जामनगर-अहमदाबाद-सूरत इंटरसिटी या मार्गावर आधीपासूनच कार्यरत आहे. यामुळे या मार्गावर वंदे भारत मेट्रो ट्रेन चालवली जाणार की नाही हे जाणून घेण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. ही नवी मेट्रो ट्रेन पूर्णपणे वातानुकूलित आहे.
यात वंदे भारत एक्स्प्रेस सारख्याचं सुविधा मिळणार आहेत. अधिका-यांनी सांगितल्याप्रमाणे, वंदे भारत मेट्रोचे वेळापत्रक, गंतव्य स्थान आणि ती कोणत्या दिवशी झेंडा दाखवली जाईल याची घोषणा होणे अजून बाकी आहे.
पण, स्वातंत्र्यदिनी त्याचे लोकार्पण होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे स्वातंत्र्यदिनी, 15 ऑगस्टला ही गाडी कोणत्या मार्गावर धावेल हे स्पष्ट होणार आहे. तथापि, गांधीनगर ते भुज दरम्यान ही गाडी चालवली जाण्याची दाट शक्यता आहे.