Vande Bharat Express : नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विविध दहा मार्गांवर नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या आहेत. यामुळे वंदे भारत एक्सप्रेसची संख्या 51 वर पोहोचली आहे. यातील आठ मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस मात्र आपल्या महाराष्ट्रातून धावत आहेत हे विशेष.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, नागपूर ते बिलासपुर, इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही हाय स्पीड ट्रेन सध्या स्थितीला सुरू आहे.
याचाच अर्थ देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला एकूण सहा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे. विशेष म्हणजे भविष्यात मुंबईला आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची सौगात दिली जाणार आहे. पुण्याला देखील भविष्यात वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळेल अशी शक्यता आहे.
मुंबई, पुण्याला मिळणार नवीन वंदे भारत ट्रेन
सध्या मुंबईहून सहा वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. यातील चार गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू आहेत तर दोन गाड्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून सुरू आहेत.
दुसरीकडे पुण्याला एक वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे. मुंबई ते सोलापूर यादरम्यान सुरू असलेली वंदे भारत एक्सप्रेस पुणे मार्गे चालवली जात आहे. अर्थातच अजूनही पुणे रेल्वे स्थानकावरून थेट वंदे भारत एक्सप्रेस धावत नाहीये.
मात्र पुणेकरांचे हे देखील स्वप्न आता पूर्ण होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद, पुणे ते शेगाव, पुणे ते वडोदरा अशा मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे.
याशिवाय मुंबई ते शेगाव, मुंबई ते कोल्हापूर, मुंबई ते छत्रपती संभाजी नगर अशा काही मार्गांवर देखील ही हायस्पीड ट्रेन आगामी काळात सुरू होईल असा दावा केला जात आहे.
या मार्गावर धावणार वंदे भारत ट्रेन
देशभरात वंदे भारत लोकप्रिय होत आहे. देशातील विविध मार्गांवर चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत रेल्वेचा सातत्याने विस्तार होत आहे. अशातच आता दक्षिणेतील आणखी एका मार्गावर वंदे भारत सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय रेल्वे कर्नाटकातील बेंगळुरू आणि तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली यांना जोडणारी वंदे भारत ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त नुकतेच प्रसारमाध्यमांमध्ये समोर आले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या पत्रानुसार, वंदे भारत लवकरच या मार्गावरील रुळांवर धावणार आहे.
तिरुचिरापल्ली रेल्वे विभागाकडून वंदे भारत ट्रेन तिरुचिरापल्ली जंक्शन ते बेंगळुरू अप-डाउन एकाच दिवसात चालवण्याची विनंती करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात यादेखील मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावेल अशी आशा व्यक्त होत आहे.