Vande Bharat Express : गेल्या काही वर्षांपासून वंदे भारत एक्सप्रेस बाबत मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. ही भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन 2019 मध्ये सर्वप्रथम सुरू झाली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत देशातील एकूण 25 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे 2024 पर्यंत देशातील 75 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्याचा मानस केंद्र शासनाचा आहे. म्हणजे देशातील आणखी 50 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू होणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून विविध महत्त्वाच्या रेल्वे मार्गाची पाहणी केली जात आहे. अशातच या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात देशातील काही महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू होणार आहे. सप्टेंबर महिन्यात दक्षिण पूर्व रेल्वे विभागातील उत्तर प्रदेश येथील वाराणसी ते टाटानगर दरम्यानच्या मार्गावर देखील ही गाडी सुरू केली जाणार आहे.
सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकते असा दावा एका मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पूर्व तयारी पूर्ण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावर 150 किलोमीटर प्रति तास या वेगाने वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे.
निश्चितच पुढल्या महिन्यात या मार्गावर ही गाडी सुरू झाली तर येथील प्रवाशांना या गाडीमुळे मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवास गतिमान होण्यास मदत मिळणार आहे. दरम्यान महाराष्ट्रालाही आगामी काही महिन्यात आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या स्थितीला महाराष्ट्रात पाच वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.
मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपुर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या मार्गावर देखील आगामी काही महिन्यात ही गाडी सुरू होणार आहे. मार्च 2024 नंतर मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकते असा दावा केला जात आहे.