Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील सर्वात आधुनिक एक्सप्रेस ट्रेन म्हणून ओळखली जाते. ही गाडी मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आलेली संपूर्ण भारतीय बनावटीची गाडी आहे. सध्या ही गाडी देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. यापैकी सहा मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर आणि नागपूर ते इंदोर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
ज्या ठिकाणी ही हाय स्पीड ट्रेन सुरू करण्यात आली आहे तेथील रेल्वे प्रवाशांचा प्रवास गतिमान झाला आहे. ही गाडी कमाल 180 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम आहे.
या गाडीत सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद आणि आरामदायी झाला आहे.
या भारतीय बनावटीच्या गाडीला प्रवाशांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला आहे. हेच कारण आहे की आता भारतीय रेल्वे मार्च 2024 पर्यंत देशातील 75 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन करू शकते असा दावा प्रसारमाध्यमांमध्ये केला जाऊ लागला आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ ते मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असे वृत्त देखील समोर आले आहे. मात्र याबाबत अद्याप भारतीय रेल्वेने कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही.
पण लवकरच रेल्वे बोर्ड या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवण्याची घोषणा करू शकते. अशातच आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे लखनऊ ते पाटणा दरम्यानही वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याची योजना आखली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर रेल्वेच्या लखनऊ विभागाकडून या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लखनऊ ते पाटणा दरम्यान धावणारी ही हायस्पीड ट्रेन सुलतानपूर आणि वाराणसीमधून जाणार आहे.
यामुळे काशीला जाणाऱ्या पर्यटकांना आणि भाविकांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे. काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना या गाडीमुळे जलद दर्शन घेता येणार आहे.
पण ही गाडी केव्हा सुरू होणार याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. यामुळे आता रेल्वे बोर्ड ही गाडी केव्हा सुरू करते याकडे सर्वांचे विशेष लक्ष लागून राहणार आहे.