Vande Bharat Express : सध्या देशात वंदे भारत एक्सप्रेस बाबत विषय चर्चा पाहायला मिळत आहेत. ही देशातील मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली पहिली भारतीय बनावटीची हायस्पीड ट्रेन म्हणून ओळखली जात आहे. ताशी 180 किलोमीटर वेगाने धावणारी ही संपूर्ण स्वदेशी ट्रेन अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे.
ही गाडी सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. यानंतर मग टप्प्याटप्प्याने देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले.
आत्तापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले आहे. विशेष बाब अशी की, यापैकी सहा मार्ग आपल्या महाराष्ट्रातून जातात.
राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर आणि नागपूर ते इंदूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी लखनऊ ते मुंबई, मुंबई ते जालना, मुंबई ते अहमदाबाद, पुणे ते वडोदरा, पुणे ते सिकंदराबाद या मार्गावरही वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाऊ शकते असे देखील वृत्त समोर आले आहे.
जर या मार्गावर ही गाडी सुरू झाली तर या संबंधित भागातील रेल्वे प्रवाशांना निश्चितचं मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र याबाबत रेल्वे बोर्डाकडूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
अशातच आता बिहारला थेट राजधानी दिल्लीपर्यंत वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करता येणार असल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील सीतामढी ते नवी दिल्ली दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाऊ शकते.
सीतामढी, दरभंगा, समस्तीपूर, मुझफ्फरपूरसह उत्तर बिहारमधील लोकांचे वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. समस्तीपूर डीआरएम यांनी प्रस्ताव पाठवला आहे. पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार खंडेलवाल आता त्यास मान्यता देतील.
त्यानंतर, रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतर बंदे भारत ट्रेन सीतामढी, दरभंगा, समस्तीपूर, मुझफ्फरपूर, पाटलीपुत्र स्थानकांवरून नवी दिल्लीला धावेल. यासाठी सीतामढी, जयनगर, दरभंगा आणि सस्तीपूर स्थानकांवर चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
सध्या बिहार मधील सीतामढी ते दिल्लीदरम्यानचा प्रवास करण्यासाठी 22 ते 24 तासांचा वेळ खर्च करावा लागत आहे. मात्र या गाडीमुळे अवघ्या सहा ते सात तासात हा प्रवास पूर्ण करता येणार आहे.