Vande Bharat Express : काल लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असून चार जून 2024 ला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर देशातील काही महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस ही हायस्पीड ट्रेन सुरू केली जाणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली हाय स्पीड ट्रेन 2019 मध्ये पहिल्यांदा रुळावर धावली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, CSMT ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर या गाडीचे यशस्वीरित्या संचालन केले जात आहे.
विशेष म्हणजे ज्या मार्गावर ही गाडी सुरू आहे तेथील प्रवाशांचा प्रवास तर गतिमान झालाच आहे शिवाय प्रवाशांना आरामदायी प्रवास अनुभवता येत आहे. यामुळे या एक्सप्रेस गाड्यांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत असून रेल्वेला देखील चांगले उत्पन्न मिळत आहे. यामुळे संपूर्ण देशभरात वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे विस्तारण्यासाठी रेल्वे प्रयत्नशील असल्याचे दिसते.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर देशातील दोन महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याची बातमी समोर येत आहे. यातील एक गाडी आपल्या महाराष्ट्राला मिळणार हे विशेष. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर लोकसभा निवडणुकीनंतर वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे.
खरे तर, लोकसभा निवडणुकांपूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या मार्गावर लवकरच वंदे भारत ट्रेन धावणार असे म्हटले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापूर येथे आले असता कोल्हापूरला लवकरच नवीन वंदे भारत ट्रेन मिळणार असल्याचा दावा केला होता.
यानंतर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोल्हापूर भेटीमध्ये मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस लोकसभा निवडणुकीनंतर सुरू केली जाणार अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. एकंदरीत मुंबई ते कोल्हापूर यादरम्यान लवकरच ही हाय स्पीड ट्रेन सुरू होणार आहे.
खरे तर राजधानी मुंबईहून कोल्हापूर येथील करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या खूपच मोठी आहे. त्यामुळे ही गाडी सुरू झाली तर मुंबई मधल्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय कोल्हापूर येथूनही मोठ्या प्रमाणात जनता शिक्षण, उद्योग, रोजगार निमित्ताने तसेच पर्यटनासाठी मुंबईत जात असते.
यामुळे याही लोकांना या गाडीचा फायदा होणार आहे. दुसरीकडे मुंबई-कोल्हापूर व्यतिरिक्त बिहारला देखील नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. बिहारची राजधानी पटना ते राष्ट्रीय राजधानी दिल्ली यादरम्यान नवीन वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे. सध्या या मार्गावर सुरू असलेल्या एक्सप्रेस गाड्यांना हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तेरा तासांचा कालावधी लागतो.
मात्र या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू झाल्यानंतर हा प्रवास फक्त आणि फक्त नऊ तासात पूर्ण होण्याची शक्यता आहे. ही ट्रेन पाटणा येथून सुरू होईल आणि आरा, बक्सर, डीडीयू मार्गे दिल्लीला पोहोचणार आहे. ही गाडी देखील लोकसभा निवडणुकीनंतर सुरू होणार आहे.