Vande Bharat Express : सध्या संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेसची विशेष क्रेज पाहायला मिळत आहे. या गाडीबाबत सर्वसामान्यांच्या मनात मोठी उत्सुकता आहे. या देशातील मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेल्या पहिल्या हायस्पीड ट्रेनमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा आधीच्या तुलनेत गतिमान आणि सुरक्षित झाला आहे.
या गाडीमुळे आरामदायी प्रवास अनुभवता येत आहे. विकसित देशांच्या धरतीवर सुरू झालेली ही ट्रेन अल्पकालावधीतच भारतीय रेल्वे प्रवाशांमध्ये लोकप्रिय बनली आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ही पहिल्यांदा 2019 मध्ये नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली होती. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतरही महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली.
आतापर्यंत देशातील 35 महत्त्वाच्या मार्गांवर ही ट्रेन धावत आहे. काल अर्थातच 18 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावरील दुसऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे.
अशातच आता भारतीय रेल्वे प्रभू श्री रामजी यांचे जन्मस्थळ श्रीक्षेत्र अयोध्या ते माता जानकी यांचे जन्मस्थळ श्रीक्षेत्र सीतामढी यादरम्यान वंदे साधारण एक्सप्रेस ट्रेन चालवणार अशी बातमी समोर आली आहे.
खरे तर नवीन वर्षात श्रीक्षेत्र अयोध्या येथे तयार होत असलेले भव्य दिव्य राम मंदिर राम भक्तांसाठी खुले होणार आहे.
22 जानेवारी 2024 रोजी या भव्य दिव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामजीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मंदिराचे कपाट राम भक्तांसाठी खुले केले जाणार आहे.
दरम्यान या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वीच अयोध्या ते सीतामढी दरम्यान वंदे साधारण ट्रेन चालवली जाणार आहे. याबाबत रेल्वेकडून तयारी सुरू आहे.
जानेवारीपर्यंत दोन्ही शहरांमध्ये वंदे भारत सुरू होण्याची शक्यता आहे. वंदे साधारण ट्रेन म्हणजेच अमृत भारत ट्रेन या मार्गावर चालवली जाणार असून या गाडीचे रेक सीतामढीला पोहोचले देखील आहेत.
सीतामढी आणि अयोध्या दरम्यानच्या अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनची ट्रायल रन सीतामढ़ी ते दिघा ब्रिज, पाटलीपुत्र जंक्शनमार्गे अयोध्येपर्यंत चालवली जाणार आहे. या मार्गांवर दोन-तीन चाचणी घेतल्यानंतर मग या गाडीच्या उदघाट्नाची तारीख जाहीर केली जाणार आहे.