Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाईस्पीड ट्रेन नेहमीच चर्चेत असते. ही हायस्पीड ट्रेन रेल्वे प्रवाशांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. या ट्रेनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.
वंदे भारत एक्सप्रेस बाबत बोलायचं झालं तर ही गाडी आतापर्यंत देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू झाली आहे. विशेष म्हणजे वर्ष 2024 अखेरपर्यंत देशातील 60 महत्त्वाच्या मार्गांवर या ट्रेनचे संचालन सुरू होणार अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर येत आहे.
अशातच आता एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टने लवकरच केरळला एक नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे सांगितले आहे.
भारतीय रेल्वे अधिकारी नवीन वंदे भारत ट्रेन एर्नाकुलम-बेंगळुरू किंवा तिरुवनंतपुरम-कोइम्बतूर मार्गावर चालवण्याचा विचार करत आहेत.
तत्पूर्वी, अलीकडेच तिरुअनंतपुरम-कासारगोड वंदे भारत एक्स्प्रेस अलाप्पुझा ते मंगळुरुपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, ज्याचा प्रवाशांना खूप फायदा होण्याची अपेक्षा आहे.
आता तिरुअनंतपुरम विभागाला आणखी एक नवीन वंदे भारत मिळू शकते अशी बातमी समोर येत आहे. केरळमध्ये वंदे भारत ट्रेन खूपच लोकप्रिय झाली आहे. यामुळे केरळमध्ये नवनवीन मार्गांवर ही गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
‘मनोरमा’ अहवालानुसार, एर्नाकुलम-बंगळुरू मार्गावर वंदे भारत ट्रेनची मागणी काही काळापासून होत होती, परंतु देखभालीचे काम करण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने ती अद्याप देण्यात आलेली नाही.
तथापि, एर्नाकुलममध्ये विद्युतीकृत पिट लाइन लवकरच कार्यान्वित केली जाईल. केरळचे खासदार हिबी ईडन यांनी नुकतेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी बेंगळुरू-एर्नाकुलम मार्गावर वंदे भारत चालवण्याची गरज स्पष्ट केली आहे.
ही ट्रेन बेंगळुरूहून पहाटे ५ वाजता चालवल्यास अनेक प्रवाशांना त्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्राला देखील आगामी काळात अनेक वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई ते कोल्हापूर, पुणे ते सिकंदराबाद, मुंबई ते शेगाव, पुणे ते शेगाव अशा विविध मार्गांवर ही ट्रेन चालवली जाणार असे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासहित देशातील अनेक भागांमधील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.