Vande Bharat Express : नवीन वर्ष सुरू होण्यास मात्र 13 ते 14 दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे. आता सर्वजण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयार आहेत. दरम्यान नवीन वर्षाच्या पूर्वीच मुंबईकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला लवकरच एक नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर ही गाडी चालवली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे ही गाडी नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. खरे तर, मुंबई येथील भाविक मोठ्या संख्येने कोल्हापूर येथील करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी जात असतात.
दररोज हजारोंच्या संख्येने भाविक कोल्हापूरमध्ये हजेरी लावतात. शिवाय कोल्हापूर येथून राजधानी मुंबईमध्ये कामानिमित्त येणाऱ्या दैनंदिन प्रवाशांची संख्या देखील विशेष उल्लेखनीय आहे.
पण मुंबई ते कोल्हापूर दरम्यान रेल्वे गाड्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करताना प्रवाशांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हेच कारण आहे की राजधानी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली गेली पाहिजे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे.
विशेष म्हणजे भारतीय रेल्वेने या मागणीची दखल घेत आता मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारती एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
केव्हा सुरू होणार मुंबई कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस?
मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
या वंदे भारत एक्सप्रेसचे 17 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पण या वंदे भारत एक्सप्रेसला सांगली आणि किर्लोस्करवाडीत थांबा मिळाला नसल्याने या भागातील रेल्वे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मात्र ही गाडी सातारा रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा होईल आणि तेथील प्रवाशांचा प्रवास गतिमान होईल अशी आशा आहे.