Vande Bharat Express : आगामी 2024 मध्ये लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. मात्र निवडणुकीचे पडघम आत्तापासूनच वाजू लागले आहेत. देशातील सर्वच प्रमुख पक्षांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान निवडणुकीचा हंगाम पाहता केंद्र शासनाने सर्वसामान्यांना खुश करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून देशात आगामी काही महिन्यात वेगवेगळ्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जाणार आहेत. खरंतर वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन 2019 मध्ये रेल्वेच्या ताफ्यात आली. आतापर्यंत देशातील 25 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे.
यापैकी पाच मार्ग महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर आणि नागपूर ते बिलासपूर या महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे. अशातच आता भारतीय रेल्वेला 9 वंदे भारत एक्सप्रेसचे गिफ्ट मिळणार आहे.
या 9 पैकी काही गाड्या मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांना दिल्या जाणार आहेत. राजस्थान आणि मध्यप्रदेश मध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असल्याने या राज्यांना वंदे भारत एक्सप्रेसच गिफ्ट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार चेन्नई येथील कोच फॅक्टरी मधून 9 वंदे भारत एक्सप्रेस बाहेर पडल्या आहेत.
आता या गाड्या देशातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर सुरू केल्या जाणार आहेत. मात्र कोणत्या मार्गांवर या गाड्या सुरू होतील याबाबत कोणतीच माहिती हाती आलेली नाही. परंतु या कोचं फॅक्टरी मध्ये तयार करण्यात आलेल्या नऊ गाड्यांपैकी 3 गाड्या दक्षिण रेल्वेला, पश्चिम रेल्वे, उत्तर-पश्चिम, दक्षिण-मध्य, पूर्वकिनारी आणि पूर्व-मध्य रेल्वे विभागाला प्रत्येकी 1 गाडी मिळेल असे सांगितले जात आहे.
तसेच यापैकी राहिलेली एक गाडी कोणत्या विभागात जाईल हे अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही. दरम्यान या सर्व गाड्या आठ डब्यांच्या राहणार आहेत. या गाड्या कोणत्या मार्गावर धावतील आणि यांचे लोकार्पण केव्हा होईल याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही परंतु लवकरच रेल्वे मंत्रालयाकडून याबाबत माहिती दिली जाणार आहे.
या नऊ गाड्या कोणत्या मार्गावर धावतील याबाबत माहिती हाती आलेली नसली तरी देखील काही मीडिया रिपोर्ट मध्ये यापैकी दोन गाड्या जयपूर ते इंदोर आणि जयपूर ते उदयपूर या दोन महत्त्वाच्या मार्गावर सुरू केल्या जाणार असा दावा करण्यात आला आहे.
तसेच पुरी ते रुरकेला आणि पाटणा ते हावडा या दोन महत्त्वाच्या मार्गावर देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठीचे नियोजन सुरू झाले आहे. यामुळे आता आगामी काही महिन्यात रेल्वे मंत्रालयाकडून कोणत्या 9 मार्गावर ही गाडी चालवली जाते हे पाहणे विशेष उत्सुकताचे राहणार आहे.