Vande Bharat Express : रेल्वे प्रवाशांचा प्रवास गतिमान करण्यासाठी भारतीय रेल्वेने 2019 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन सुरू केली आहे. ही ट्रेन सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत देशातील एकूण 25 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरु झाली आहे.
यापैकी महाराष्ट्राला एकूण पाच गाड्यांची भेट मिळाली आहे. या गाडीला रेल्वे प्रवाशांनी चांगला भरभरून प्रतिसाद दाखवला आहे. महाराष्ट्रातून धावणाऱ्या पाचही वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांनी चांगली पसंती दाखवली असून या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
पण या गाडीचे तिकीट दर हे इतर एक्सप्रेस गाडीच्या तिकीट दरापेक्षा अधिक आहेत. यामुळे सर्वसामान्य लोक या गाडीने प्रवास करण्यास उत्सुक नाहीत. मात्र आता भारतीय रेल्वेने प्रवाशांना स्वस्तात मस्त प्रवास करता यावा यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आता वंदे भारत एक्सप्रेसने स्वस्तात प्रवास करता यावा यासाठी नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील पहिली नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे.
विशेष बाब म्हणजे या चालू वर्षात या अशा प्रकारच्या दोन गाड्या चालवल्या जाणार आहेत. यामुळे सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना स्वस्तात वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्याचा अनुभव घेता येणार आहे.
यामुळे सर्वसामान्यांचा प्रवास जलद होईल अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे. या नव्याने दाखल होणाऱ्या Non AC वंदे भारत ट्रेनचे तिकीट दर वाजवी आणि सर्वसामान्यांना परवडतील असे राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कशी असणार नॉन एसी वंदे भारत
एका प्रतिष्ठित मेडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात भारतीय रेल्वेच्या ताफ्यात येणाऱ्या या नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसची बाह्य रचना सध्या अस्तित्वात असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा भिन्न राहणार आहे. मात्र यामध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध राहणार आहेत.
यामुळे प्रवाशांचा प्रवास हा आरामदायी होणार आहे. या नवीन गाड्यांमध्ये फायर अलार्म सिस्टीम, इमर्जन्सी अलार्म या सुविधा उपलब्ध असतील. तर या ट्रेनमधील टॉयलेट हे वंदे भारत एक्सप्रेसप्रमाणेच अतिशय अत्याधुनिक राहतील.
दोन डब्यांमध्ये जर्क-फ्री प्रवास करण्यासाठी सुधारित कपलर देखील राहणार आहेत. तसेच या ट्रेनला एलएचबी कोच राहणार अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र या नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस चा स्पीड हा कमी राहणार आहे. सरासरी 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे.
तसेच सध्या अस्तित्वात असलेली एसी वंदे भारत एक्सप्रेस ही 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहे. या गाडीचा वेग कमी असला तरी देखील या गाडीमध्ये वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणेच अत्याधुनिक सोयीसुविधा राहतील जेणेकरून प्रवाशांना कमी दरात आरामदायी आणि सुरक्षित प्रवास अनुभवता येईल.