Vande Bharat Express Train : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी 2019 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली पहिली हायस्पीड ट्रेन सुरू केली. नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर पहिल्यांदाच कमाल 180 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावणारी वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली.
त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने देशातील विविध मार्गांवर ही गाडी सुरू झाली. आतापर्यंत भारतातील 34 महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर ही गाडी सुरू करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे आगामी काही महिन्यात आणखी काही मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जातील अशी माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार मार्च 2024 पर्यंत देशातील 75 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू होऊ शकते. निश्चितच यामुळे भारतातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी गतिमान होणार आहे यात शंकाच नाही.
महाराष्ट्रातील कोणत्या मार्गावर धावते वंदे भारत एक्सप्रेस
सध्या धावत असलेल्या 34 वंदे भारत एक्सप्रेस पैकी सहा गाड्या आपल्या महाराष्ट्रातून धावत आहेत. राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते बिलासपुर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या सहा मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवली जात आहे.
यापैकी चार मार्ग हे मध्य रेल्वेचे आहेत. विशेष म्हणजे मुंबई ते छत्रपती संभाजीनगर आणि पुणे ते सिकंदराबाद या मध्य रेल्वेच्या आणखी दोन महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला चालवले जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
खरे तर ही गाडी सुरू झाल्यापासून प्रवाशांचा प्रवास हा जलद, सुरक्षित, आरामदायी झाला आहे यात शंकाच नाही. पण, या गाडीचे तिकीट दर खूपच अधिक आहेत. यामुळे ही गाडी सर्वसामान्यांना परवडत नाही असा आरोप केला जात होता.
यामुळे भारतीय रेल्वेची मोठी किरकिरी झाली होती. मात्र आता सर्वसामान्यांना परवडणारी वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस नॉन एसी राहणार आहे. या नॉन एसी वंदे भारत ट्रेनला सर्वसाधारण वंदे भारत एक्सप्रेस म्हणून ओळखले जाणार आहे.
या 5 मार्गांवर सूरु होणार वंदे साधारण ट्रेन
मीडिया रिपोर्टनुसार वंदे साधारण एक्सप्रेस ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. ही गाडी 130 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावेल. या गाडीत वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणेच सर्व हायटेक सोयी सुविधा राहणार आहेत.
फक्त ही एक नॉन एसी गाडी राहील. दरम्यान ही गाडी सुरवातीच्या टप्प्यात देशातील पाच महत्त्वाच्या मार्गांवर चालवली जाणार आहे. हे पाच मार्ग रेल्वेने निश्चित केले आहेत. म्हणजे या मार्गावर वंदे साधारण एक्सप्रेस ट्रेन सुरू होणे जवळपास नक्की झाले आहे.
नवी दिल्ली-पाटणा, नवी दिल्ली-हावडा, नवी दिल्ली- हैदराबाद, नवी दिल्ली-मुंबई, एनारकुलम-गुवाहाटी या पाच मार्गांवर वंदे साधारण एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार अशी माहिती समोर आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेला दिल्लीचा प्रवास अधिक जलद गतीने करता येणार आहे.