Vande Bharat Express Train : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राला लवकरचं चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत. भारतातील सर्वात हायटेक, सेमी-हाय-स्पीड लक्झरी ट्रेन, वंदे भारत एक्सप्रेस लवकरच राज्यातील चार मार्गांवर सुरू होणार अशी खात्रीलायक बातमी हाती आली आहे.
यातील एक मार्ग महाराष्ट्राला दक्षिणेकडील कर्नाटक राज्याशी जोडेल, तर दुसरा मार्ग महाराष्ट्राला गुजरातसोबत जोडणार आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते हुबळी आणि पुणे ते कोल्हापूर या तीन वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता.
दरम्यान, आता पुणे शहराला आणखी चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार अशी बातमी हाती आली आहे. सध्या पुण्यातून पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी आणि मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस गाडी सुरु आहे.
मात्र आगामी काळात पुणे ते शेगाव, पुणे ते बेळगाव, पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते बडोदा या मार्गावर देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे आणखी मजबूत होणार आहे.
सध्या महाराष्ट्रात किती वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत
सध्या संपूर्ण देशात 65 महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेसचे संचालन सुरू आहे. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत 11 वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे.
महाराष्ट्रातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी, नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर या अकरा महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
आगामी काळात मात्र पुण्याला आणखी चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळणार आहे. यामुळे वंदे भारत एक्सप्रेसची ही संख्या लवकरच पंधरावर जाईल असे भासत आहे.
एवढेच नाही तर काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये मुंबई ते कोल्हापूर, मुंबई ते शेगाव या मार्गावरही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकते असा दावा केला जात आहे.