Vande Bharat Express : पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुका आयोजित होणार आहेत. त्यामुळे सध्या देशभरात निवडणुकीचे वारे वाहत असल्याचे पाहायला मिळत नाही. निवडणुकीचे पडघम आत्तापासूनच वाजू लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध निर्णय घेतले जात आहे. वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार आता देशातील काही महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोदी सरकार मार्च 2024 पर्यंत देशातील एकूण 75 महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन चालवणार आहे. सध्या स्थितीला देशातील 34 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू आहे. यापैकी सहा मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्राला लाभलेल्या सहा वंदे भारत एक्सप्रेस पैकी शेवटची वंदे भारत एक्सप्रेस नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली आहे.
इंदोर ते नागपूर दरम्यान ही नवीन एक्सप्रेस सुरू झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या सहा एवढी बनली आहे. विशेष म्हणजे आगामी काळात राज्याला आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. राज्यातील मुंबई ते जालना, मुंबई ते कोल्हापूर, मुंबई ते अमरावती, पुणे ते सिकंदराबाद या चार महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचे नियोजन भारतीय रेल्वे आखत असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रात सध्या किती वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत?
महाराष्ट्रात सध्या मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, नागपूर ते बिलासपूर, मुंबई ते गोवा आणि इंदोर ते नागपूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.
कोणत्या मार्गांवर सुरु होणार नवीन वंदे भारत ट्रेन ?
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे नॉर्थ ईस्ट मधील मेघालय, त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरला देखील वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. खरंतर, जम्मू-काश्मीरला एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे. दिल्ली ते काटरा दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरु आहे. पण काश्मीरमधील नागरिकांना वंदे भारत एक्सप्रेसचा अजून लाभ मिळालेला नाही.
हेच कारण आहे की, आता काश्मीरमधील श्रीनगरपर्यंत वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्या जम्मू ते श्रीनगर दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल अशी माहिती समोर आली आहे. म्हणजेच भविष्यात दिल्ली ते श्रीनगर पर्यंत वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाऊ शकते असे सांगितले जात आहे. याशिवाय, मेघालय आणि त्रिपुरा राज्यालाही प्रत्येकी एक-एक वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.