Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी 2019 मध्ये पहिल्यांदा रुळावर धावली. नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ही गाडी सुरू करण्यात आली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरु करण्यात आले. सध्या देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
यातील अकरा गाड्या आपल्या महाराष्ट्रातून धावतात हे विशेष. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते इंदोर, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
अशातच महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक शहरातुन थेट वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार असे आश्वासन रेल्वे मंत्र्यांच्या माध्यमातून समोर आले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, खासदार राजाभाऊ वाजे यांनी नुकतीच नाशिककरांच्या रेल्वेशी संबंधित विविध प्रश्नांबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान खासदार वाजे यांनी नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाब मंत्री वैष्णव यांच्याशी सविस्तर चर्चा केलीय.
नाशिक- पुणे सेमी हाय स्पीड रेल्वेसंदर्भात झालेली चर्चा ही सकारात्मक ठरली. हा मार्ग जुन्याच मार्गाने व्हावा, यामध्ये सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, चाकण ही गावे असून काही तांत्रिक अडचणी असल्यास त्या दूर कराव्यात, अशी मागणी वाजे यांनी केली.
यावर हा प्रकल्प जुन्यास मार्गाने होणार असे आश्वासन वैष्णव यांनी दिले. या प्रकल्पासाठी नारायणगाव येथील रेडिओ दुर्बिणीचा अडथळा येत आहे. मात्र हा अडथळा लवकरच दूर होईल आणि हा प्रकल्प मार्गी लावला जाईल असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.
यावेळी खासदार महोदयांनी नाशिक वरून धावत असणाऱ्या ज्या गाड्या कोरोना काळात बंद झाल्यात त्या गाड्या आणि इतर जलद रेल्वेला बंद करण्यात आलेले थांबे पुन्हा सुरू करावेत अशी मागणी उपस्थित केली. यालाही रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
नाशिक- पुणे रेल्वे, नाशिक-कल्याण लोकल, नाशिक ते वाढवण बंदर त्र्यंबकेश्वरमार्गे नवीन मार्ग विकसित करणे या नाशिककरांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या यावेळी खासदार महोदयांनी उपस्थित केल्यात. तसेच नाशिक वरून थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी अशी ही मागणी यावेळी खासदार महोदयांनी उपस्थित केली.
दरम्यान खासदार वाजे यांनी उपस्थित केलेल्या या मागणीवर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिलेले आहे. यामुळे आगामी काळात नाशिककरांना वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे बोलले जात आहे.