Vande Bharat Express : नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दहा नवीन मध्ये भारत एक्सप्रेसची भेट दिली. यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील तीन गाड्यांचा देखील समावेश होता. नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते हुबळी आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे.
या गाड्या 16 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झाले आहेत. या गाड्यांमुळे राज्यातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या 11 वर पोहोचली आहे.
सध्या राज्यातून मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते शिर्डी, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते हुबळी, पुणे ते कोल्हापूर या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान अलीकडेचं सुरू झालेल्या नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागपूर ते सिकंदराबाद या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसून जेव्हापासून ही गाडी सुरू झाली आहे तेव्हापासून तोट्यात आहे.
यामुळे रेल्वे मंत्रालयाला ही गाडी बंद करावी लागणार असा दावा जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणूकित जनतेची दिशाभूल करण्यासाठी ही वंदे भारत ट्रेन सुरू केली असल्याचे म्हटले आहे.
या भागातील जनतेची कोणत्याही प्रकारची मागणी नसताना ही वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा घाट का घातला गेला असा सवाल देखील यावेळी देशमुख यांनी उपस्थित केला. या गाडीला प्रवासी मिळत नसल्याने ही गाडी तोट्यात आहे.
यामुळे या ट्रेनमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 80 हुन अधिक कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च देखील यातून निघणार नसल्याचे दिसते. यामुळे लवकरच रेल्वे या गाडीचा डब्यांची संख्या कमी करणार असा दावा देशमुख यांनी केला आहे.
प्रवाशी वाढण्याची शक्यता नसल्याने ही गाडी आगामी काळात बंदही होऊ शकते. देशमुख म्हणतात की वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर हे स्लीपर पेक्षा चार पट जास्त आणि थर्ड एसी पेक्षा दीडपट जास्त आहेत.
यामुळे या वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर कमी करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय दिसत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस चे तिकीट दर कमी केलेत तर या गाडीला प्रतिसाद मिळू शकतो असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.