Vande Bharat Express News : महाराष्ट्राला लवकरच आणखी एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्या राज्यातील 11 महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू असून महाराष्ट्राला आणखी एका नव्या गाडीची भेट मिळणार आहे. ही नवी गाडी पुणे ते शेगाव दरम्यान चालवली जाणार आहे. नक्कीच ही गाडी सुरू झाल्यानंतर पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुण्याहून दररोज हजारो भाविक शेगावला दर्शनासाठी जात असतात तसेच श्रीक्षेत्र शेगाव येथील असंख्य लोक पुण्यात कामा निमित्ताने येतात. म्हणून जर या मार्गावर ही गाडी सुरू झाली तर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या पुण्याला तीन वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळालेली आहे, यातील दोन गाड्या थेट पुण्यातून सुटतात तर एक गाडी मुंबईवरून सुटते.
पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या ट्रेन्स थेट पुणे रेल्वे स्थानकावरून सोडल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस आहेत आणि मुंबई येथील सीएसएमटी ते सोलापूर दरम्यान चालवली जाणारी वंदे भारत ट्रेन देखील पुणे मार्गे धावते. दरम्यान आता पुण्याला चौथी गाडी मिळणार आहे.
चौथी गाडी पुणे ते शेगाव या मार्गावर चालवली जाणार असून ही गाडी उत्तर महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबवली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या गाडीला उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ आणि जळगाव या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर होऊ शकतो असा एक अंदाज समोर येत आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील भुसावळ आणि जळगाव ही उत्तर महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची रेल्वे स्थानके असून या रेल्वेस्थानकावरून पुण्याकडे आणि शेगावला जाणाऱ्यांची संख्या उल्लेखनीय आहे. भुसावळ हे मध्य रेल्वे मार्गावरील एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे रेल्वे स्थानक आहे.
पण अजूनही भुसावळला वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली नाही. यामुळे भुसावळ रेल्वे स्थानकाला वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळावी अशी येथील प्रवाशांची मागणी आहे. दरम्यान, आता ही मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात असून पुणे ते शेगाव दरम्यान वंदे भारत ट्रेन चालवली जाऊ शकते.
मीडिया रिपोर्टनुसार पुण्याला आगामी काळात चार नव्या वंदे भारत ट्रेन मिळणार आहेत पुणे ते शेगाव, पुणे ते बेळगाव, पुणे ते वडोदरा आणि पुणे ते सिकंदराबाद या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू होणार अशी शक्यता आहे.