Vande Bharat Express News : महाराष्ट्राला लवकरच आणखी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव यांनी धुळ्याहून पुण्यासाठी आणि मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केली. धुळे ते पुणे आणि धुळे ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार असे खासदार महोदयांनी रेल्वेमंत्र्यांना पटवून दिले.
यामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणी संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली. दुसरीकडे आता राज्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मराठवाड्यातील नांदेड शहराला देखील लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
खरंतर सध्या स्थितीला मुंबई ते जालना या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून ही गाडी पुढे नांदेड पर्यंत विस्तारली जाणार आहे. मुंबई जालना वंदे भारत गाडीचा विस्तार नांदेड पर्यंत करण्यासाठी रेल्वे विभागाकडून हालचाली सुरू आहेत. असे झाल्यास मुंबई ते नांदेड आणि नांदेड ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईहून दररोज हजारो नागरिक नांदेडला जात असतात आणि नांदेडहूनही मुंबईला जाणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. यामुळे जालनापर्यंत धावणारी गाडी नांदेड पर्यंत धावली तर नांदेडच्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. मात्र या विस्ताराचा काही प्रवासी संघटनांकडून विरोध केला जात आहे.
मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसला संभाजीनगर मधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून ही गाडी नांदेड पर्यंत विस्तारली गेली तर या गाडीचे वेळापत्रक कोलमडेल आणि याचा या मार्गावरील प्रवाशांना फटका बसेल असे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. यामुळे मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस नांदेड पर्यंत धावणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
सध्या महाराष्ट्रातून किती वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत?
वंदे भारत एक्सप्रेस 2019 मध्ये सुरू झाली आणि सध्या स्थितीला महाराष्ट्रातील अकरा मार्गांवर ही गाडी सुरू आहे. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.