Vande Bharat Express : मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आलेली संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस ही गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने चर्चेत राहिली आहे. ही गाडी देशात सर्वप्रथम 2019 मध्ये रुळावर पाहायला मिळाली होती. सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर या गाडीची सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या गाडीचा विस्तार झाला आणि सध्या स्थितीला ही गाडी देशातील 34 महत्त्वाच्या मार्गावर धावत आहेत.
या गाडीने रेल्वे प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी बनवला आहे. यामुळे या गाडीला प्रवाशांनी अगदी डोक्यावर घेतले आहेत. अल्प कालावधीत ही गाडी प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. हेच कारण आहे की भारतीय रेल्वेच्या माध्यमातून मार्च 2024 पर्यंत देशातील एकूण 75 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू केले जाणार आहे. यासाठीचे नियोजन आत्तापासूनच सुरू झाले असून आगामी काही महिन्यात देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
यामुळे निश्चितच देशातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुलभ होणार आहे यात शंकाच नाही. अशातच आता वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठा आणि कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वंदे भारत ट्रेनमधील प्रवाशांचा प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी भारतीय रेल्वे प्रवासी सेवा करार (YSA) सादर करणार आहे. याअंतर्गत वंदे भारतमध्ये वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांना 6 नवीन सुविधा देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी देशातील 34 मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस पैकी सहा मार्गांची निवड करण्यात आली आहे.
एक पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरुवातीच्या टप्प्यात 6 मार्गांवर या नवीन सुविधा सुरू केल्या जाणार आहेत. चेन्नई-म्हैसूर, चेन्नई-तिरुनेलवेली, चेन्नई-कोइम्बतूर, तिरुवनंतपुरम-कासारगोड, चेन्नई-विजयवाडा या मार्गावर या नवीन सुविधा पुरवल्या जाणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. आता आपण या नवीन पायलट प्रोजेक्ट अंतर्गत कोणकोणत्या सुविधा प्रवाशांना मिळणार आहेत याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
प्रवाशांना काय सुविधा मिळणार
वंदे भारत ट्रेनमधील प्रवाशांना आता विमान प्रवासासारखा अनुभव मिळणार आहे. आता या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत प्रवाशांना खाण्यापिण्यासाठी खास मेनू दिला जाणार यामध्ये त्यांना जेवणाचे अधिक विकल्प मिळणार आहेत.
एवढेच नाही तर Vande Bharat चा प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी बनवण्यासाठी प्रवाशांना अधिक अॅक्सेसरीज आणि आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिला जाणार आहेत.
विशेष बाब म्हणजे आता वंदे भारत ट्रेन ने प्रवास करणाऱ्या या मार्गावरील प्रवाशांना घरातून उचलण्यासाठी आणि सोडण्यासाठी कॅब सेवा पुरवली जाणार आहे. त्यामुळे या ट्रेनचा प्रवास आणखी जलद गतिमान आणि आरामदायी होण्यास मदत मिळणार आहे. प्रवाशांना आता घरापासूनच प्रवासाचे साधन उपलब्ध होणार आहे. परिणामी प्रवासादरम्यान येणाऱ्या विविध अडचणींचा निपटारा या निमित्ताने होणार आहे.
विशेष बाब म्हणजे अपंग आणि गरजू प्रवाशांचा देखील प्रवास सुखकर बनवण्यासाठी या प्रकल्पांतर्गत उपायोजना केल्या जाणार आहेत. या अंतर्गत अपंग व्यक्तींसाठी स्टेशनवर व्हीलचेअर सहाय्यक उपलब्ध करून दिले जाणार अशी माहिती समोर आली आहे.
ट्रेनमध्ये देखील अनेक बदल केले जाणार आहेत. यामध्ये इंफोटेनमेंटची व्यवस्था केली जाईल. म्हणजे ट्रेनमध्ये तुम्ही चित्रपट किंवा तुमच्या आवडीचा कोणताही कार्यक्रम पाहू शकणार आहात. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होईल. त्यांना प्रवासादरम्यान बोर वाटणार नाही.
प्रवाशांच्या मदतीसाठी प्रत्येक कोचमध्ये एक कुशल हाऊसकीपिंग कर्मचारी देखील ठेवला जाणार आहे. या कर्मचाऱ्याला विशेष ट्रेनिंग देखील दिले जाणार आहे.