Vande Bharat Express Marathi : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील पहिली स्वदेशी बनावटीची सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन 2019 पासून रुळावर धावत आहे. सुरुवातीला ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर ही ट्रेन देशातील विविध प्रमुख मार्गांवर सुरू झाली. आतापर्यंत देशातील 51 महत्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
या 51 पैकी आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. आतापर्यंत देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला सहा वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या उपराजधानीला अर्थातच नागपूरला दोन वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत.
देशातील ज्या मार्गांवर ही हाय स्पीड ट्रेन सुरू करण्यात आली आहे तेथे या गाडीला चांगला प्रतिसादही मिळत आहे. तिकीट दर अधिक असतानाही या रेल्वेने प्रवास करण्यास अधिक पसंती दाखवली जात आहे. 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावणाऱ्या या ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवास जलद होत आहे.
या ट्रेनमध्ये अशा काही वर्ल्ड क्लास सोयीसुविधा आहेत ज्या की इतर ट्रेनमध्ये पाहायला मिळत नाहीत. वंदे भारतचा प्रवास म्हणजे अगदी विमानासारखा प्रवास असे बोलले जाते. यामुळे तिकीट दर अधिक असतानाही वंदे भारत ट्रेन ने प्रवास करण्याला अनेक जण पसंती दाखवत आहेत.
अशातच आता देशाला 52 वी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार असे वृत्त समोर आले आहे. अशा परिस्थितीत आता आपण देशातील कोणत्या मार्गांवर कोणत्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार, अन याचे वेळापत्रक कसे राहणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कोणत्या मार्गावर धावणार?
मिळालेल्या माहितीनुसार, बेंगलुरु – मदुराई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. 52 वी वंदे भारत ट्रेन बेंगळुरू आणि मदुराई दरम्यान धावणार अशी आशा आहे. दक्षिण रेल्वेने नुकत्याच काही दिवसांपूर्वी या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याची मोठी घोषणा केली होती. यानंतर दक्षिण रेल्वेने यां मार्गावर वंदे भारतची यशस्वी चाचणी सुद्धा घेतली.
मात्र चाचणी झाल्यानंतरही या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होऊ शकली नाही. ही सेवा 20 जूनपासून सुरू होणार होती परंतु 17 जून रोजी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या रेल्वे अपघातानंतर ती पुढे ढकलण्यात आली. आता वंदे भारत ट्रेन बेंगळुरू आणि मदुराई दरम्यान जुलैमध्ये सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र यासंदर्भात अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
कसं राहणार वेळापत्रक ?
या ट्रेनचे वेळापत्रक कसे राहणार या संदर्भात अजूनही रेल्वे कडून अधिकृत अधिसूचना प्राप्त झालेली नाही. मात्र काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले गेले आहे की, ही वंदे भारत एक्सप्रेस सकाळी 5.15 वाजता मदुराई रेल्वे स्टेशनवरून निघेल आणि नंतर 1.15 वाजता बेंगळुरूला पोहोचणार आहे.
यानंतर, परतीच्या वेळी, वंदे भारत बेंगळुरू रेल्वे स्थानकातून दुपारी 1.45 वाजता सुटेल आणि नंतर 5 वाजता सेलम स्थानकावर पोहोचेल. रात्री 8.20 वाजता त्रिची आणि त्यानंतर रात्री 10.25 वाजता मदुराई रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.