Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. खरे तर ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली आहे. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली होती. महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्रात मुंबई सेंट्रल ते गांधीनगर या मार्गावर पहिल्यांदा ही ट्रेन सुरू झाली. सध्या स्थितीला देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साई नगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
अशातच आता महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्याला नववी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही नववी वंदे भारत ट्रेन कोल्हापूर ते मुंबई दरम्यान चालवली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ही नववी गाडी सुरू केली जाणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रात जे नवीन सरकार स्थापित होईल ते नवीन सरकार या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि महाराष्ट्रातील भाजपाचे ताकतवर नेते रावसाहेब दानवे यांनी जानेवारी 2024 मध्ये या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवले जाणार असे म्हटले होते. त्यावेळी त्यांनी पुढील दोन महिन्यात आम्ही या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवू असे सांगितले होते.
मात्र अजूनही या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली नाही. यामुळे मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार की नाही या संदर्भात नागरिकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती पाहायला मिळत आहे.
परंतु नुकत्याच काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे आयोजित एका प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरला लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार अशी घोषणा केली आहे.
यामुळे मुंबई ते कोल्हापूर दरम्यान लवकरच वंदे भारत ट्रेन चालवली जाऊ शकते असे बोलले जात आहे. खरे तर कोल्हापूर येथे स्थित अंबाबाईच्या दर्शनासाठी मुंबई सहित संपूर्ण देशभरातील भाविक हजेरी लावत असतात.
मुंबई मधून दररोज हजारोंच्या संख्येने भाविक कोल्हापूरला येत असतात. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या मुंबईकरांची संख्या खूपच अधिक आहे. शिवाय कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या देखील उल्लेखनीय आहे.
यामुळे ही हाय स्पीड ट्रेन सुरू झाली तर या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे या गाडीचा सांगली आणि सातारा मधील रेल्वे प्रवाशांना देखील फायदा होणार आहे. अशा परिस्थितीत ही गाडी आता कधी सुरू होते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.