Vande Bharat Express : देशात सर्वप्रथम 2019 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस ही हाई स्पीड ट्रेन सुरू झाली. तेव्हापासून आतापर्यंत देशातील एकूण 34 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे मीडिया रिपोर्ट मध्ये मार्च 2024 पर्यंत देशातील 75 महत्त्वाच्या मार्गांवर ही हाई स्पीड ट्रेन चालवली जाणार असा दावा केला जात आहे.
म्हणजेच केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे तयार केले जाणार आहे. अशातच आता वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात केंद्रातील मोदी सरकारचा एक मास्टर प्लॅन समोर आला आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज शुक्रवारी 8 डिसेंबर 2023 रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना वंदे भारत एक्सप्रेस बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
सिंधीया यांनी सांगितल्याप्रमाणे, केंद्र सरकार 2047 पर्यंत देशभरात जवळपास 4,500 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु करणार आहे.
सध्या 34 मार्गांवर ही गाडी सुरू आहे मात्र 2047 पर्यंत ही संख्या हजारोंच्या घरात जाणार आहे. यामुळे देशातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत गतिमान सुरक्षित आणि आरामदायी होणार असा आशावाद व्यक्त केला जातोय.
तसेच देशाच्या आर्थिक राजधानीत आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई येथे तयार होत असलेले नवीन विमानतळ केव्हा सुरू होणार ? याबाबत देखील महत्त्वाचे अपडेट सिंधीया यांनी दिल आहे.
केव्हा सुरू होणार मुंबईतील नवीन विमानतळ
ज्योतिरादित्य यांनी सांगितल्याप्रमाणे, 2026-27 पर्यंत देशाला पहिली बुलेट ट्रेनची भेट मिळणार आहे. सध्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू असून हा प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होणार अशी आशा आहे.
म्हणजेच येत्या काही वर्षात देशातील नागरिकांना बुलेट ट्रेनने सुद्धा प्रवास करता येणे शक्य होणार आहे. तसेच त्यांनी पुढल्या वर्षी अर्थातच 2024 मध्ये मुंबई येथील नवीन विमानतळ सर्वसामान्यांसाठी सुरू होणार अशी माहिती दिली आहे.
याव्यतिरिक्त जेवर येथे विकसित होत असलेले नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टही पुढील वर्षी सुरु होणार अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
उत्तर प्रदेश मधील अयोध्या येथे देखील एअरपोर्ट विकसित केले जात असून हे विमानतळ डिसेंबर अखेरपर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू होणार असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. विशेष बाब म्हणजे अयोध्या येथे तयार होत असलेले हे नवीन विमानतळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू केले जाणार आहे.