Vande Bharat Express : महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे मजबूत व्हावे यासाठी रेल्वे विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सध्या महाराष्ट्रात अकरा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते जालना CSMT ते शिर्डी, CSMT ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चे संचालन सुरू असून या सर्व गाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय.
दरम्यान राज्याच्या मराठवाडा विभागातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याला लवकरच एक मोठी खुशखबर मिळेल असे चित्र आहे. नांदेडला लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळू शकते.
मुंबई ते जालना दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार नांदेड पर्यंत करण्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या असून यामुळे येत्या काही दिवसांनी नांदेडला वंदे भारत एक्सप्रेसची सौगात मिळू शकते असे दिसते.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभगात शंभर टक्के विद्युतीकरण झाले आहे. तरी, बहुप्रतिक्षीत मुंबई-जालना वंदेभारतसह तिरूपती-निजामाबाद रॉयल सिमा एक्सप्रेस यासह अन्य रेल्वेंच्या विस्ताराची प्रतिक्षाच आहे.
याच साऱ्या पार्श्वभूमीवर भाजपचे नांदेड येथील राज्यसभा खासदार डॉ अजित गोपछडे यांनी मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस नांदेडपर्यंत विस्तारित व्हावी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. याबाबत त्यांनी राज्यसभेत अतारांकित प्रश्न देखील मांडला होता. याशिवाय नांदेड रेल्वे स्थानक परिसर स्वच्छता यासाठी राज्यसभेत अतारांकित प्रश्न मांडला होता.
दरम्यान राज्यसभा खासदारांच्या या अतारांकित प्रश्नाच्या अनुषंगाने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत नांदेडपर्यंत विस्तारित करण्याबाबतचा अहवाल संबंधित विभागाने तातडीने सादर करावा, असे आदेश दिलेले आहेत. परंतू, मुंबई ते जालना धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या विस्तारास छत्रपती संभाजीनगर येथील व्यापारी महासंघाने मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला आहे.
रेल्वेच्या विस्तारामुळे छत्रपती संभाजीनगरचा आरक्षणाचा कोटा घटणार आहे. शिवाय वेळापत्रकही विस्कळीत होणार असल्याचा सूर या संघटनांमधून उमटत आहे. दुसरीकडे मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाकडून मात्र मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस चा विस्तार नांदेड पर्यंत व्हावा यासाठी पाठिंबा दर्शवला जात आहे.
त्यामुळे आता याबाबत रेल्वे बोर्ड नेमका काय निर्णय घेणार, मुंबई ते जालना दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस नांदेड पर्यंत येणार का? हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे. पण जर मुंबई ते जालना वंदे भारत ट्रेन नांदेड पर्यंत सुरू झाली तर याचा नांदेड जिल्ह्यातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.