Vande Bharat Express : जर तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. ते म्हणजे भारतीय रेल्वे लवकरच देशातील काही महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवणार आहे. रिपोर्टनुसार, देशात प्रथमच एकाच वेळी 9 वंदे भारत एक्सप्रेसचे संचालन केले जाणार आहे.
सध्या स्थितीला देशातील एकूण 25 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू असून आगामी काही महिन्यात देशातील आणखी 9 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला चालवले जाणार आहे. यामुळे वंदे भारत एक्सप्रेसची संख्या 25 वरून थेट 34 होणार आहे. एकंदरीत भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला तर देशातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या झपाट्याने वाढण्यास मदत मिळणार आहे.
खर तर ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली. तेव्हापासून देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला चालवले जात आहे. विशेष म्हणजे आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार असल्याने ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत त्या राज्यातील नागरिकांना खुश करण्यासाठी आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू केले जाणार आहे.
दरम्यान आता आपण भारतीय रेल्वे कोणत्या 9 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू करू शकते याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. मीडिया रिपोर्टनुसार, चेन्नई येथील कोच फॅक्टरी मध्ये 9 वंदे भारत एक्सप्रेस तयार झाल्या आहेत. या नऊ गाड्या आता देशातील वेगवेगळ्या मार्गावर चालवल्या जाणार आहेत.
त्यापैकी पाच मार्ग निश्चित झाले आहेत तर चार मार्ग येत्या काही दिवसात निश्चित केले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इंदुर-जयपुर, जयपुर-उदयपुर, पुरी-राउरकेला, पटना-हावडा, जयपुर-चंदीगढ या पाच मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे निश्चित झाले आहे.
तसेच चार वंदे भारत एक्सप्रेससाठी लवकरच मार्ग अंतिम केले जाणार आहेत. निश्चितच या महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी चालू झाली तर संबंधित रेल्वे प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्रातून किती वंदे भारत एक्सप्रेस धावतात?
सध्या महाराष्ट्रातील पाच महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर आणि नागपूर ते बिलासपुर या महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
शिवाय येत्या काही महिन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर यादरम्यान देखील वंदे भारत एक्सप्रेस चालवणे प्रस्तावित आहे. तसेच पुणे ते सिकंदराबाद दरम्यानही वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचे नियोजन भारतीय रेल्वेचे आहे. याशिवाय नागपूर ते सिकंदराबाद दरम्यानही वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाऊ शकते असे सांगितले जात आहे.