Vande Bharat Express : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 फेब्रुवारी रोजी मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या एक्सप्रेसला प्रवाशांची मोठी पसंती देखील मिळत आहे. या एक्सप्रेसमुळे पुणे, सोलापूर येथील प्रवाशांना राजधानी मुंबईत जाण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. निश्चितच या एक्सप्रेसमुळे सोलापूर पुणे आणि मुंबई या दरम्यानचा प्रवास सुलभ झाला आहे.
असे असले तरी सोलापूरहुन मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्याची मोठी मागणी वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यापासून होऊ लागली आहे. याच संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून एक मोठी माहिती देण्यात आली आहे. सोलापूर हुन मुंबईला जाण्यासाठी मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन दुपारी बारा वाजता सुटते. आणि मुंबईहून सोलापूरच्या दिशेने येणारी वंदे भारत ट्रेन सायंकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघते.
अशा परिस्थितीत बाराच्या गाडीने सोलापूर हुन मुंबईला गेलेल्या प्रवाशांसाठी मुंबईमध्ये काम करण्यासाठी खूपच कमी कालावधी मिळतो. यामुळे या प्रवाशांना प्रतीचा प्रवास करण्यासाठी वंदे भारत ट्रेनने प्रवास करता येत नाही. परिणामी या ट्रेनच्या वेळेत बदल करण्याची मागणी आहे.या ट्रेनची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणाहून सुटणाऱ्या वेळेत बदल करण्याची मागणी आहे. ही गाडी मुंबईतून सोलापूरकडे उशिरा निघावी अशी प्रवाशांची मागणी रेल्वे प्रशासनाकडे देखील आली आहे.
विशेष बाब म्हणजे रेल्वे प्रशासनाकडून याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देखील दिल जात आहे. गेल्या आठवड्यात रेल्वेचे मॅनेजर सोलापूर येथे आले होते.यावेळी प्रवाशांच्या वेळेत बदल करण्याच्या मागणी संदर्भात आम्ही संबंधितांना कळविले असल्याचे त्यांनी सांगितले असून या संदर्भात सकारात्मक विचार केला जाणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली आहे. म्हणजेच आता मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या मुंबईहून सुटणाऱ्या वेळेत बदल होणार आहे.
सायंकाळी चार ऐवजी आता मुंबईहून उशिरा ही ट्रेन सुटणार आहे. याबाबत अजून निर्णय झालेला नाही मात्र लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जनरल मॅनेजर यांनी सोलापूर दौऱ्यावर दिली आहे. यामुळे निश्चितच सोलापूर आणि पुणे वासियांना याचा लाभ होणार असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच जनरल मॅनेजर नीरज कुमार दोहरे यांनी वंदे भारत ट्रेनच्या ऑटोमॅटिक डोअर संदर्भात देखील मोठी माहिती दिली.
या ऑटोमॅटिक डोअर मध्ये थोडासा बदल करण्यात आला असून याबाबत असलेली तांत्रिक अडचण लवकरच सोडवली जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. सोबतच दोहरे यांनी सायंकाळी मुंबईहून उपनगरीय गाड्यांची संख्या वाढते यामुळे वंदे भारत ट्रेनच्या टाइमिंग मध्ये बदल करताना या गोष्टीचा देखील विचार केला जाणार असल्याचे नमूद केले.