Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची ट्रेन आहे जी की, 2019 मध्ये भारतीय रेल्वेच्या ताफ्यात समाविष्ट झाली होती. ही गाडी 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम आहे. तसेच या ट्रेनमध्ये अनेक वर्ल्ड क्लास सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित झाला आहे.
रेल्वे प्रवाशांना या गाडीमुळे आरामदायी प्रवास करता येत आहे. परिणामी, या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान भारतीय रेल्वेने आतापर्यंत 41 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीची सेवा सुरू केली आहे.
विशेष म्हणजे यापैकी सात मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते गोवा, नागपूर ते बिलासपुर आणि इंदूर ते नागपूर या मार्गांवर या गाडीची सेवा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे या वंदे भारत एक्सप्रेसच्या सेवेला प्रवाशांनी अभूतपूर्व प्रतिसाद दाखवला आहे. अशातच आता पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे.
ही बातमी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक कामाची ठरणार आहे. कारण की मध्य रेल्वे मुंबई ते कोल्हापूर दरम्यान लवकरच वंदे भारत ट्रेन सुरू करणार अशी माहिती समोर येत आहे.
खरेतर, मुंबईहून कोल्हापूरला करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मातेचे मंदिर हे राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे.
अशा परिस्थितीत येथे राज्यभरातील भाविक दररोज दर्शनासाठी गर्दी करत असतात. यामध्ये मुंबईहून येणाऱ्या भाविकांची संख्या विशेष उल्लेखनीय आहे. शिवाय कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या देखील नेहमीच अधिक राहिली आहे.
कोल्हापूरहून राजधानीला शिक्षण, उद्योग, पर्यटन इत्यादी कारणांसाठी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हेच कारण आहे की मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरत आहे.
दरम्यान याच मागणीची आता दखल घेण्यात आली असून मध्य रेल्वे लवकरच या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवणार अशी आशा आहे. विशेष म्हणजे सेंट्रल रेल्वे पुणे ते वडोदरा या मार्गावर देखील ही हायस्पीड ट्रेन चालवू शकते. पुणे ते वडोदरा दरम्यान चालवली जाणारी ही वंदे भारत एक्सप्रेस वसई रोड मार्गे धावणार असा अंदाज आहे.
परिणामी महाराष्ट्रातून गुजरातला जाणाऱ्या आणि गुजरातहून महाराष्ट्रात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी ही गाडी खूपच फायद्याची ठरणार आहे. दरम्यान या दोन्ही गाडीचे संचालन लवकरच सुरू झाले तर महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या 9 वर पोहोचणार आहे.