Vande Bharat Express : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्राला लवकरच एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झालेली संपूर्ण भारतीय बनावटीची हायस्पीड ट्रेन आहे.
ही गाडी सर्व्यात आधी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली होती. त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने देशातील अन्य काही महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला चालवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे.
विशेष असे की, यापैकी सहा वंदे भारत एक्सप्रेस या आपल्या महाराष्ट्राला मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे ही संख्या आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण की, भारतीय रेल्वे मार्च 2024 पर्यंत देशभरातील 75 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला सुरू करणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्राची राजधानी अर्थातच मुंबईवरून आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस सुरु केली जाणार आहे. मुंबई ते जौनपूर या मार्गावर ही गाडी सुरू करण्याचे नियोजन आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील मुंबई ते उत्तर प्रदेशातील जौनपूरपर्यंत वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यास तत्वतः मान्यता दिली असल्याचे मोठे वृत्त समोर आहे. वैष्णव यांनी नवीन ट्रेनच्या रुट सर्व्हेचे आदेशही दिले असून, लवकरच ही ट्रेन सुरु करण्यात येणार असल्याचे कळत आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष कृपा शंकर सिंह (जे जौनपूर जिल्ह्यातील आहेत) यांनी 6 नोव्हेंबर रोजी रेल्वेमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ही मंजुरी मिळाली, तेव्हा त्यांनी रेल्वे सेवेची मागणी करणारे पत्र देखील सादर केले आहे.
निश्चितच या मार्गावर जर ही गाडी सुरू झाली तर उत्तर प्रदेश राज्यातून मुंबईमध्ये कामासाठी येणाऱ्या कामगार वर्गाची मोठी सोय होणार आहे. यामुळे उत्तर प्रदेश मधील जनतेला राजधानी मुंबईत येणे सोपे होणार आहे.
यानिमित्ताने उत्तर प्रदेशच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. खरे तर सध्या स्थितीला मुंबई ते उत्तर भारतातील सध्याची रेल्वे सेवा प्रवाशांसाठी सोयीची नसल्याचे चित्र आहे.
उत्तर भारतातील रेल्वे प्रवाशांना मुंबईमध्ये येण्यासाठी अगदी तारेवरची कसरत करावी लागत आहे. हेच कारण आहे की, मुंबई ते जौनपूर ही गाडी सुरू झाली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली आहे.
दरम्यान रेल्वे मंत्र्यांनी या गाडीला तत्वतः मंजुरी देखील दिली आहे. यामुळे आता या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस केव्हा सुरू होणारे याकडे या परिसरातील रेल्वे प्रवाशांचे विशेष लक्ष लागून राहणार आहे.