Vande Bharat Express : मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस ही हाय स्पीड ट्रेन 2019 मध्ये सर्वप्रथम रुळावर धावली. तेव्हापासून देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ही गाडी सुरू करण्यात आली आहे.
आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरु झाली आहे. आपल्या राजालाही एकूण सहा वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळाली आहे.
यामध्ये राजधानी मुंबईला चार वंदे भारत एक्सप्रेस मिळाले आहेत. तसेच उपराजधानी नागपूरला दोन वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत.
विशेष बाब म्हणजे 2047 पर्यंत साडेचार हजार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन देशातील विविध मार्गांवर सुरू होणार आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीच ही माहिती दिली आहे.
यानुसार मार्च 2024 पर्यंत देशातील 75 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी चालवली जाणार आहे. अशातच आता देशातील दहा मार्गांवर लवकरच वंदे भारत एक्सप्रेस लॉन्च केली जाणार आहे.
यामध्ये देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला दोन आणि राज्याच्या सांस्कृतिक राजधानी पुण्याला दोन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार असे सांगितले जात आहे.
कोणत्या मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस
तेलंगाना टुडे या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार देशात लवकरच दहा वंदे भारत एक्सप्रेस लॉन्च केल्या जाणार आहेत. सध्या देशात 34 वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून जर आगामी काही दिवसात 10 नवीन वंदे भारत ट्रेन चालवल्या गेल्या तर ही संख्या 44 वर जाणार आहे.
तेलंगाना टुडे ने सांगितल्याप्रमाणे मुंबई ते जालना, मुंबई ते कोल्हापूर, पुणे ते वडोदरा, पुणे ते सिकंदराबाद, वाराणसी ते लखनऊ, पटना ते जलपाईगुडी, मडगाव ते मेंगलोर, दिल्ली ते अमृतसर, इंदोर ते सुरत आणि टाटा नगर ते वाराणसी या मार्गावर ही गाडी सुरू केली जाऊ शकते.
नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान दुसरी वंदे भारत सुरू होणार
वंदे भारत एक्सप्रेस ही हाय स्पीड ट्रेन सुरुवातीला नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवण्यात आली. 2019 मध्ये ही ट्रेन सुरू झाली आणि या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास गतिमान झाला.
दरम्यान आता या मार्गावर दुसरी गाडी सुरू केली जाणार आहे. लवकरच नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान दुसरी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी माहिती एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.